वायू प्रदूषण रोखण्यासाठी पालिका सरसावली

वायू प्रदूषण रोखण्यासाठी पालिका सरसावली

Published on

वायू प्रदूषण रोखण्यासाठी पालिका सरसावली
नियम न पाळणारे बांधकाम आठवडाभर बंद ठेवण्याचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २६ : शहरातील वाढते वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने कठोर भूमिका घेतली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विकसकांच्या गृहप्रकल्‍पाचे बांधकाम एक आठवडा बंद ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले आहेत. याबरोबरच तंदूर भट्टी, बांधकाम क्षेत्र आणि आरएमसी प्लांटवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
हिवाळ्याच्या काळात थंडी आणि प्रदूषणामुळे हवेत धुरके व धुलिकणांचे प्रमाण मोठे असते. सध्या वाऱ्याचा वेग कमी असल्यामुळे ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुचविलेले सर्व नियम काटेकोरपणे अमलात आणण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. वारंवार सूचना देऊनही नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही या वेळी देण्यात आले. शहरात सुरू असलेल्या बांधकाम साइट्सवर धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना प्रत्यक्ष राबवल्या जात आहेत की नाही, याची खात्री करण्यासाठी नगररचना विभाग आणि विभागीय कार्यालयातील अभियंत्यांनी स्वतः साइटवर जाऊन तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तपासणीदरम्यान त्रुटी आढळल्यास संबंधित बांधकाम साईट आठवडाभर बंद ठेवण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले. याशिवाय मुख्य रहदारीचे रस्ते आणि एमआयडीसी परिसरातील रस्त्यांच्या कडेला साचलेली माती वाहनांच्या वेगामुळे हवेत उडत असल्याने धुळीचे प्रमाण वाढत आहे. यासाठी रस्त्यांच्या कडेला असलेली माती साफ करून उचलून नेण्यासाठी विशेष धडक मोहीम राबविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. ही प्रक्रिया दर पंधरा दिवसांनी नियमितपणे राबविण्यात येणार आहे. पालिकेच्या या विशेष बैठकीमध्ये अतिरिक्त आयुक्त सुनील पवार व डॉ. राहुल गेठे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
----------------------------------------
आरएमसी प्लांटवर कारवाई करा
कॉरी साइट्स व सिमेंट निर्मितीचे आरएमसी प्लांट या ठिकाणीही प्रदूषण प्रतिबंधाचे नियम पाळले जात असल्याची प्रत्यक्ष पाहणी करून खातरजमा करावी व अहवाल द्यावा, असे आयुक्तांनी निर्देशित केले. अशाच प्रकारे बेकरीत कोळशाचा वापर होत असेल तर तो बंद करावा तसेच तंदूरसाठी हॉटेलमध्ये होणाऱ्या कोळशाच्या वापरासही प्रतिबंध करावा. त्याचप्रमाणे कुठे कचरा जाळला जात असेल तर त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, असे आयुक्तांनी सूचित केले.
-------------------------------------------
गावठाणातील स्वच्छतेकडे लक्ष द्या
दैनंदिन स्वच्छतेमध्ये गावठाणातील कचरा संकलनाकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे स्पष्ट करीत स्वच्छता अधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांच्याकडे गावठाणांच्या कार्यक्षेत्राची जबाबदारी सोपवून गावांच्या अंतर्गत भागातील कचरा संकलन कसे होईल याचे नियोजन करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. रहिवासी सोसायट्यांच्या मागे बायलेन स्वच्छतेकडेही विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com