सिडको वसाहतीतील रहिवाशांना दिलासा

सिडको वसाहतीतील रहिवाशांना दिलासा

Published on

सिडको वसाहतीतील रहिवाशांना दिलासा
५५० चौरस फुटांच्या रहिवासा सोसायटीची कामे महापालिका करणार

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २६ : नवी मुंबई महापालिका हद्दीत सिडकोने उभारलेल्या वसाहतींमधील (कंडोमिनियम) रहिवाशांना आता नागरी सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी ३०० चौरस फुटांपर्यंत घरांचा आकार असलेल्या वसाहतींमध्येच नागरी सुविधा पुरविण्याची परवानगी राज्य सरकारने दिली होती. या बंधनामुळे शहरातील जवळपास ७० टक्क्यांहून अधिक वसाहतींमध्ये नागरी सुविधांची कामे करणे नवी मुंबई महापालिकेस शक्य नव्हते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर ५५० चौरस मीटर क्षेत्रफळ असणाऱ्या सोसायट्यांना हा आदेश लागू झाला आहे.
नवी मुंबईत सिडकोने बैठ्या तसेच इमारती असलेल्या अनेक वसाहती उभारल्या आहेत. या वसाहतींमधून चार लाखांच्या आसपास नागरिक वास्तव्यास आहेत. सिडकोने ही घरे उभारत असताना सुरुवातीच्या टप्प्यात येथील नागरी संघटनांना ओनर्स असोसिएशन कायद्यांतर्गत नोंदणीकृत केले. येथील नागरी संघटनांनी वसाहतीमधील नागरी सुविधांची कामे तसेच देखभाल दुरुस्तीची कामे घरमालकांकडून कायदेशीर शुल्क आकारून करावीत, असे सिडकोने गृहीत धरले होते. या वसाहतींमधील सफाईची यंत्रणा तसेच इतर देखभालीची कामेदेखील रहिवाशांकडून वसूल केले जाणाऱ्या मासिक शुल्कातून भागवावी, असे सिडकोचे म्हणणे होते. बैठ्या चाळी आणि इमारतीमधील मलवाहिन्या आणि जलवाहिन्या बदलण्याचे काम रहिवाशांच्या आवाक्याबाहेरचे होते. लोकसभा निवडणुकीत खासदार नरेश म्हस्के यांनी रहिवाशांचा हा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी शासन स्तरावर उपमुख्यंमत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ते पाठपुरावा करीत होते. एक वर्षाच्या पाठपुराव्यानंतर राज्य शासनाने सिडको वसाहतीमधील ३०० चौरस फुटांच्या घराचा चौरस आकार असलेल्या वसाहतींना नागरी सुविधा पुरविण्याचा अध्यादेश काढला होता. मात्र ५५० चौरस फूट आकाराची घरे असलेल्या सर्वच सिडको वसाहतींमध्ये नवी मुंबई महापालिकेने नागरी सुविधा देण्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी नगरविकास विभागाकडे पुन्हा पाठपुरावा सुरू केला.
---------------------------------------
सुधारित आदेश
नगरविकास विभागाने नुकताच सुधारित अध्यादेश काढत ५५० चौरस फूट आकाराची घरे असलेल्या सर्वच सिडको वसाहतींना नागरी सुविधा देण्याचे आदेश नवी मुंबई महापालिकेला दिले आहेत. या आदेशामुळे नवीन जल आणि मलवाहिन्या बदलणे व इतर नागरी सुविधा येथील नागरिकांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याकरिता नवी मुंबई शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर द्वारकानाथ भोईर आणि माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com