राज्यघटना सत्यात उतरवण्याचा निर्धार

राज्यघटना सत्यात उतरवण्याचा निर्धार

Published on

विरार, ता. २६ (बातमीदार) : ७५ वर्षे संविधानाचे आणि ४३ वर्षांचा श्रमजीवी संघटनेचा संघर्षाचा प्रवास या दोन शक्ती नव्या पिढीला दिशा देणारी आहेत. इतिहासाची कृतज्ञता, वर्तमानाचा संघर्ष आणि भविष्यात देशाची राज्यघटना सत्यात उतरवण्यासाठी निर्धार यातून आम्ही पुढील लढ्याची वाटचाल करणार आहोत, अशी प्रतिक्रिया श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी व्यक्त केली आहे.

श्रमजीवी संघटनेद्वारे आज (ता. २६) गाव-पाड्यांत हजारो ठिकाणी ४४ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. तसेच २६ नोव्हेंबर २००८ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना आदरांजली वाहिली. संविधानातील सन्मानाने जगण्याचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, संघटना करण्याचा अधिकार हे सर्व वंचिताला, गरिबाला माणूस म्हणून जगण्यासाठीचे मूलभूत अधिकार सत्यात उतरवण्यासाठी प्राणपणाने लढण्याचा निर्धार करण्यात आला. वर्धापन दिन हा संघटनेचा भक्कम पाया रचणाऱ्या निरक्षर आदिवासी ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या परि कृतज्ञता व्यक्त केली. ठाणे, पालघर, नाशिक आणि रायगड या जिल्ह्यामधील गावांमध्ये एकाच पद्धतीने कार्यक्रम साजरे होत असल्याने संघटनेचा वर्धापन दिन शिस्तबद्ध आणि उत्साहवर्धक साजरा झाला.

श्रमजीवी संघटनेची ४३ वर्षांची खडतर वाटचाल पाहता भक्कम पाया उभा करण्यासाठी गेल्या चार दशकांमध्ये मोठे बलिदान द्यावे लागले. संघटनेचे संस्थापक विवेक पंडित, संस्थापिका विद्युल्लता पंडित यांच्यासह अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी हल्ले सोसले, रक्त सांडले, अनेकदा तुरुंगवास भोगला, तर काहींना प्राणापर्यंत मुकावे लागले. या दिवसाची कृतज्ञता म्हणून संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी वसई तालुक्यातील भाताणे येथील थळ्याचा पाडा आणि विरारमधील वरठापाडा येथे ज्येष्ठ कार्यकर्त्यांना भेटले. त्यांच्या त्यागामुळे समर्पण भावनेने आज आदिवासी, कातकरी, कष्टकरी घटकांच्या प्रश्नांवर संघटना ताकदीने उभी आहे. वंचित, दुर्बलांना माणूस म्हणून सन्मानाने जगण्यास शिकवत आहे. हा इतिहास संघटनेच्या नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, पूर्वजांच्या संघर्षाची कृतज्ञता व्यक्त व्हावी आणि तरुणांनी न्याय हक्कांसाठी संघटितपणे उभे राहावे, या उद्देशाने चवळी, कडू कांद, कंदमुळे, तसेच आंबील हे पदार्थ खाऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

विविध कार्यक्रम
दिवसभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सर्व गावांमध्ये ग्रामदेवतेचे पूजन, संघटनेच्या प्रतिमांचे पूजन, ध्वजारोहण, संविधानातील मूलभूत अधिकारांचा निर्धार, गाव-पाड्यांत संघटनेच्या नामफलकांचे उद्‍घाटन, बाल संघटना शाखांचे उद्‍घाटन, तसेच संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन असे कार्यक्रम पार पडले.

मुलांच्या नाटुकल्या सादर
समाजातील कातकरींच्या समस्यांवर, तसेच संविधान सत्यात उतरवण्यासासाठी एकत्रित कृती करण्याबाबतही निर्धार जाहीर केला आहे. विवेक पंडित यांचे मार्गदर्शन, चर्चासत्रे, आदिवासी कातकरिंचे स्थलांतर थांबवणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान, तसेच रात्री आदिवासी पारंपरिक नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम व मुलांच्या नाटुकल्या सादर करून आनंद साजरा झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com