शहीद अग्निवीर नाईक यांच्या कुटुंबीयांची उच्च न्यायालयात धाव
सैनिकांप्रमाणे लाभ, भत्ते द्या!
शहीद अग्निवीरच्या कुटुंबीयांची न्यायालयात धाव
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : भारतीय सैनिकांच्या कुटुंबाला मिळणारे लाभ अग्निवीरांच्या कुटुंबीयांना देण्यास नकार दिल्याविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान शहीद अग्निवीर मुरली नाईक यांच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. अग्निपथ योजना ही अग्निवीर आणि भारतीय सैनिकांमध्ये भेदभाव निर्माण करते. अग्निवीरांच्या कुटुंबीयांनाही नियमित सैनिकांप्रमाणे अनुदान, योजना, भत्त्यांचा लाभ द्यावा, अशी प्रमुख मागणी याचिकेत केली आहे. त्यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर आणि भारतीय सैनिकांमध्ये भेदभाव करण्यात येत असल्याचा दावा मुरली नाईक यांची आई ज्योती नाईक यांनी केला आहे. अग्निवीरांच्या कुटुंबीयांना दीर्घकालीन पेन्शन आणि अन्य सैनिकांच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या सरकारी भत्त्यांसह विविध सरकारी योजनांपासून वंचित ठेवले जाते. त्यांचेही कुटुंबीय सर्व लाभ मिळण्यास पात्र असल्याचा दावा याचिकेत केला आहे.
---
मुख्य मागणी काय?
अग्निवीर अन्य भारतीय सैनिकांसारखेच कर्तव्य बजावतात. त्यांच्याप्रमाणे जोखीमही पत्करतात, तरीही अग्निवीरांच्या कुटुंबीयांना सरकारी योजनांपासून वंचित ठेवले जाते. शहीद अग्निवीरच्या कुटुंबीयांना जवळपास एक कोटी रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळते; मात्र पेन्शन किंवा इतर लाभ, भत्ता मिळत नाही. त्यामुळे अग्निवीरांच्या कुटुंबीयांनाही मरणोत्तर सरकारी कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याची मागणी याचिकेत केली आहे. तसेच अग्निपथ योजनेच्या संपूर्ण वैधतेला आव्हान दिले नसून ती योजना भेदभाव आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारी असल्याचे याचिकेत म्हटले आहे.
---
प्रकरण काय?
२०२३ मध्ये अग्निवीर म्हणून मुरली नाईक भारतीय सैन्यात सामील झाले होते. ऑपरेशन सिंदूरदरम्यान, ९ मे रोजी पूंछ येथे नाईक शहीद झाले. त्यांच्या मृत्यूनंतर, याचिकाकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पत्रे पाठवून अन्य सैनिकांप्रमाणे भत्त्यांची मागणी केली; तथापि त्यावर कोणतेही उत्तर न मिळाल्यामुळे त्यांच्या आईने न्यायालयात धाव घेतली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

