आदिवासी संस्कृतीचे जीवंत प्रतीक
पालघरमध्ये ''गावदेव'' पूजेचा आरंभ
आदिवासी संस्कृतीचे जीवंत दर्शन आणि सामाजिक एकोपा
कासा, ता. २६ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील ग्रामीण आदिवासी भागांमध्ये नुकतीच पारंपरिक ''गावदेव'' अर्थात वाघोबा देव पूजेला उत्साहात सुरुवात झाली आहे. पावसाळी भात कापणीची कामे संपल्यावर, दिवाळीच्या आसपास, गावाचा रक्षक देवता मानल्या जाणाऱ्या ''वाघोबा''ला वंदन करण्यासाठी हा तीन दिवसांचा उत्सव साजरा केला जातो. हा सोहळा आदिवासी संस्कृती, श्रद्धा आणि सामाजिक एकोपा यांचे सजीव प्रतीक आहे.
तीन दिवसीय उत्सवाचे स्वरूप या उत्सवात गावातील प्रत्येक कुटुंबाचा उत्स्फूर्त सहभाग असतो. पहिल्या दिवशी वाघोबा देवाची विधीवत पूजा केली जाते, दुसऱ्या दिवशी देवाला नैवेद्य अर्पण केला जातो, तर तिसऱ्या दिवशी संपूर्ण गावात प्रसादाचे वाटप केले जाते.
तोरण सोहळा या पूजेनिमित्त दर पाच वर्षांनी गावाच्या वेशीवर तोरण बांधण्याचा विशेष सोहळा पार पडतो. या दिवशी गावकरी घरातील चूल पेटवत नाहीत, तसेच सर्व दुकाने बंद ठेवली जातात. गावातील सर्व कुटुंबे एकत्रपणे गावाबाहेर झाडाखाली जेवण करतात. संध्याकाळी परत येताना वेशीवर बांधलेल्या तोरणाखालून गावात प्रवेश केला जातो. ही परंपरा गावाचे ऐक्य आणि पुनर्जन्म दर्शवते.
या पूजेच्या निमित्ताने गावातील ज्येष्ठ मंडळी एकत्र येऊन जुने वाद-विवाद, सामाजिक प्रश्न सोडवतात आणि सर्वानुमते नवीन नियम ठरवतात. यामुळे गावात सामाजिक शिस्त, न्यायनिष्ठा आणि परस्पर बांधिलकी दृढ होते. पूजेदरम्यान पारंपरिक वाद्यांच्या तालावर तरुण-तरुणी नृत्य आणि गायन सादर करतात, तसेच काही ठिकाणी यात्रांचे आयोजनही केले जाते
जीवनातील अतूट संबंध
गावदेव पूजा ही आदिवासींच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. या पूजेविना गावात कोणतेही शुभ कार्य; मग ते लग्न असो, घर बांधकाम असो किंवा वाढदिवस पार पाडले जात नाहीत. यामुळे हा उत्सव केवळ एक धार्मिक विधी नसून, आदिवासी जीवनातील संस्कारांचा आणि सामुदायिकतेचा वारसा आहे.
--------------------------
गावदेव पूजनादरम्यान गावातील वाद, प्रश्न सोडवले जातात. या पूजेमुळे गावात सामाजिक बांधिलकी आणि एकोपा निर्माण होतो. गावदेव उत्सवामुळे सर्व नागरिक एकत्र येऊन गावच्या भल्यासाठी चांगल्या गोष्टी सुचवतात.
— रघुनाथ गायकवाड, माजी उपसरपंच, कासा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

