देशात बहूमताच्या आधारावर दडपशाही

देशात बहूमताच्या आधारावर दडपशाही

Published on

देशात बहुमताच्या आधारावर दडपशाही
ठाण्यातील संविधान गौरव रॅलीत सरकारवर टीका

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : संविधान दिनानिमित्त ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या संविधान गौरव रॅलीत राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड आणि अ‍ॅड. असीम सरोदे यांनी केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी पक्षांवर तीव्र निशाणा साधला. निवडणूक प्रक्रिया, मतदार यादीतील गडबडी आणि संविधानिक मूल्यांच्या ऱ्हासाबाबत दोन्ही वक्त्यांनी कठोर भाष्य करीत देशात बहुमताच्या आधारावर दडपशाही सुरू असल्याचे सांगितले. संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू असून, नागरिकांनीच आता जागरूक राहण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले.
संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ठाण्यात बुधवारी संविधान गौरव रॅली काढण्यात आली. या रॅलीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड आणि वकील असीम सरोदे यांच्यासह शेकडो ठाणेकर सहभागी झाले होते. या वेळी नागरिकांना संबोधित करताना या दोघांनीही सरकारवर जोरदार टीका केली. आव्हाड यांनी आपल्या भाषणात निवडणूक आयोगावर आणि महापालिकेच्या मतदार याद्यांवर थेट आरोप केले. ‘निवडणूक आयोग बाहुल्यासारखा वागत आहे. मतदार याद्यांमध्ये एकाच्या नावाची सही दुसऱ्या वार्डात, तर तिसऱ्या ठिकाणी वेगळी यादी हा प्रकार म्हणजे वोटचोरीशिवाय दुसरे काय, असा टोला त्यांनी लगावला. ठाण्यातील अनेक नगरसेवकांची आणि कार्यकर्त्यांची नावे याद्यांतून गायब करण्याची पद्धत ही लोकशाहीवरील आघात असल्याचे त्यांनी नमूद केले.
आव्हाड यांनी पुढे संविधानावरील हल्ल्याचा मुद्दा उपस्थित करीत सांगितले, की संविधान बदलण्याचे प्रयत्न खुलेपणाने सुरू आहेत. गांधी-नेहरूंनी दिलेला देश हातातून निसटतोय. पोलिस यंत्रणा कमकुवत करण्याचा प्रयत्न, कामगार कायद्यांतील बदल आणि लोकशाही मर्यादा ढासळत असल्याचा त्यांनी इशारा दिला. याच कार्यक्रमात बोलताना अड. असीम सरोदे यांनी बहुमताच्या दडपशाहीचा मुद्दा ठळकपणे मांडला.
बहुमत मिळाले म्हणून सर्व निर्णय दडपशाहीच्या पद्धतीने घेणे हा लोकशाहीचा अपमान आहे, अशी जोरदार टीका त्यांनी केली. न्यायव्यवस्थेतील विलंब, माहिती अधिकारातील अडथळे आणि सीसीटीव्ही माहिती न देण्याच्या पद्धतींवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. सरोदे यांनी नागरिकांच्या अधिकारांचा मुद्दा अधोरेखित करीत म्हटले, की संविधानाने दिलेले हक्क टिकवण्याची जबाबदारी नागरिकांची आहे. न्यायालयीन प्रक्रियेत त्रुटी असतील तर त्यावर आवाज उठवणेही तेवढेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले.

स्थानक परिसरात कोंडी
राष्ट्रवादी शरद पवार गटाने आयोजित केलेली संविधान गौरव रॅली ठाणे स्थानक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली. सायंकाळी निघालेल्या या रॅलीमुळे स्थानक परिसर, कोर्ट नाका, बाजारपेठ अशा ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. याचा फटका कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांना झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com