आचारसंहिता भंग प्रकरणी दोषींवर कारवाई करा
आचारसंहिता भंग प्रकरणी दोषींवर कारवाई करा
काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नंदा म्हात्रे यांची मागणी
पेण, ता. २७ (वार्ताहर) : पेण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आदर्श आचारसंहिता भंगाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. २५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पेण शहरातील पाम बीच रोड आणि स्टेट बँक सोनोग्राफी सेंटर परिसरात उभ्या असलेल्या डंपर आणि रोड रोलरवर राजकीय नेत्यांचे छायाचित्र असलेले बॅनर आढळून आल्याने वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात दोषींवर तत्काळ कारवाई करावी, अशी जोरदार मागणी काँग्रेसच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नंदा म्हात्रे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना नंदा म्हात्रे यांनी सांगितले की, येत्या २ डिसेंबर रोजी होणाऱ्या पेण नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान सत्ताधारी भाजप पक्षाने शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष केले असून अनेक कामे अर्धवट स्थितीत टाकली आहेत. शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे ही नाराजी कमी करण्यासाठी रात्रीच्या वेळी घाईघाईत रस्ते दुरुस्तीची कामे सुरू करण्यात येत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, २५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री पाम बीच रोडवर पार्क केलेला डंपर क्रमांक एमएच-०६ बीडब्ल्यू-७४५६ व स्टेट बँक सोनोग्राफी सेंटरजवळ उभा असलेला नंबर नसलेला रोड रोलर या वाहनांवर आमदार रवीशेठ पाटील, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रीतम पाटील आणि नगरसेवक पदाचे उमेदवार अनिरुद्ध पाटील यांचे छायाचित्र असलेले रंगीत बॅनर लावण्यात आले होते. ही कृती मतदारांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने करण्यात आली असून, ती आदर्श आचारसंहितेचा स्पष्ट भंग आहे, असा आरोप नंदा म्हात्रे यांनी केला. या प्रकरणी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली असून, भरारी पथकानेही आपला अहवाल सादर केल्याचे त्यांनी सांगितले. दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा काँग्रेसतर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही नंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

