बांधकामांच्या धुळीला चाप
भाईंदर, ता. २७ (बातमीदार) : मुंबईसह संपूर्ण महानगर प्रदेशात वाढत असलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदर महापालिकेने शहरातील बांधकाम प्रकल्प सुरू असलेल्या विकसकांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना करा, अन्यथा कारवाई केली जाईल, असा थेट इशारा देण्यात आला आहे. वर्षभरापूर्वीदेखील विकसकांना याच पद्धतीच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या; मात्र नियमांचे पालन न करणाऱ्या एकाही विकसकावर ठोस कारवाई झाली नव्हती. त्यामुळे या वेळीही महापालिका दोषी विकसकांवर कारवाईचा बडगा उचलणार की नोटिसांचे कागदी घोडे नाचवले जाणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुंबई महानगर प्रदेशात सातत्याने वाढत असलेल्या प्रदूषणाविरोधात उपाययोजना करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालय व राष्ट्रीय हरित लवादाने यापूर्वीच दिले आहेत. मिरा-भाईंदरमध्ये सध्या बांधकाम प्रकल्प मोठ्या संख्येने सुरू आहेत. त्यातून उडणाऱ्या धुळीमुळे प्रदूषणात भर पडत आहे. यासाठी मिरा-भाईंदर महापालिकेच्या नगररचना विभागाकडून शहरातील बांधकाम प्रकल्प सुरू असलेल्या विकसकांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. प्रदूषण नियंत्रणाची पुरेशी खबरदारी घेऊन त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे नोटिसांमध्ये नमूद करण्यात आले आहे. यासंबंधीची मार्गदर्शक तत्त्वे विकसकांसाठी जारी करण्यात आली आहेत.
पालिकेकडून मार्गदर्शन तत्त्वे
संपूर्ण प्रकल्पाभोवती इमारतीच्या उंचीनुसार पत्र्याची कुंपण भिंत उभारणे, बांधकाम सुरू असलेल्या इमारती हिरव्या जाळीने बंदिस्त करणे, बांधकाम परिसरात पाणी फवारणी यंत्रे बसवणे, प्रकल्पातून बाहेर जाणाऱ्या वाहनांचे टायर स्वच्छ करण्यासाठी यंत्रणा उभारणे, बांधकाम साहित्य नेणारी वाहने पूर्णपणे झाकलेली असणे, बांधकामाच्या ठिकाणी सेन्सरआधारित वायू प्रदूषण दर्शक बसविणे आदी उपाययोजना करणे विकसकांवर बंधनकारक करण्यात आले आहे.
सात दिवसांची मुदत
या उपाययोजनांची अंमलबजावणी नोटीस प्राप्त झाल्यानंतर सात दिवसांत सुरू करण्यात यावी, अन्यथा महापालिकेकडून पुढील कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेकडून देण्यात आला आहे. सद्यस्थितीत शहरातील सुमारे ६० बांधकाम प्रकल्पांना नोटिसा देण्यात आल्या असून उर्वरित प्रकल्पांनाही नोटिसा देण्याचे काम सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

