महापालिका निवडणुकीत इच्छुकांची धडपड वाढली

महापालिका निवडणुकीत इच्छुकांची धडपड वाढली
Published on

महापालिका निवडणुकीत इच्छुकांची धडपड वाढली
समाजमाध्यमांवर प्रचाराला वेग; मतदारांशी थेट संपर्क
वाशी, ता. २७ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेची निवडणूक साडेपाच वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असताना, आता निवडणुकीच्या हालचालींना वेग येऊ लागल्याने इच्छुक उमेदवारांची धडपड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मतदारांमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर सुरू झाला असून, डिजिटल प्रचाराला चांगलाच जोर आला आहे.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना आणि आरक्षणाची सोडत पूर्ण झाल्यामुळे निवडणुकीची दिशा अधिक स्पष्ट झाली आहे. सध्या प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली असून त्यावर हरकती व सूचना घेण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक प्रभागात किती इमारती आहेत, मतदारांची संख्या किती आहे, नव्याने वाढलेली मतदान केंद्रे कुठे आहेत, याची बारकाईने माहिती इच्छुक उमेदवार घेत आहेत. प्रभागनिहाय सामाजिक रचना, लोकसंख्येतील बदल आणि स्थानिक प्रश्नांचा अभ्यास करून आपल्या प्रभावक्षेत्रात वाढ कशी करता येईल, यावर इच्छुकांचा भर दिसून येत आहे.
राजकीय पक्षांमध्येही उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा सुरू झाली आहे. पक्षांतील निष्ठावंत कार्यकर्ते, नव्याने प्रवेश केलेले चेहरे तसेच मागील निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार पुन्हा एकदा दावेदारी करत आहेत. एका प्रभागातून अनेक इच्छुक पुढे आल्याने पक्ष नेतृत्वासमोर आव्हान निर्माण झाले आहे. गटबांधणी, स्थानिक पातळीवरील पकड, नागरिकांशी असलेला थेट संपर्क यावर उमेदवारी ठरत असल्याचे चित्र आहे. नवी मुंबईतील राजकारणात महायुती होणार की नाही, याकडे इच्छुक उमेदवारांचे विशेष लक्ष लागले आहे. गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखालील राजकीय समीकरणांना उत्तर देण्यासाठी शिवसेना शिंदे गटानेही आढावा बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र आगामी निवडणुकीत हे नेते एकत्र येणार की आमने-सामने उभे राहणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने इच्छुकांमध्ये उत्सुकता आणि अस्वस्थता पाहायला मिळत आहे.
................
आकर्षक घोषणा
या सगळ्या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमांवरील प्रचार स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप गटांमधून अनेक इच्छुक आपली राजकीय पार्श्वभूमी, सामाजिक कामाची माहिती पोस्टर, बॅनर्स आणि व्हिडिओजच्या माध्यमातून प्रसारित करत आहेत. ‘नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध’, ‘विकासासाठी तत्पर’, ‘एकनिष्ठ कार्यकर्ता’ अशा आकर्षक घोषणा वापरून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. या पोस्टना मिळणाऱ्या लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्स यावरून लोकप्रियतेचा अंदाज घेतला जात आहे. सोशल मीडियावरील हा प्रचार प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत कितपत प्रभावी ठरेल, हे लवकरच स्पष्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com