दिव्यांगांना पालिकेच्या प्रवेशद्वारावर अपमानास्पद वागणूक

दिव्यांगांना पालिकेच्या प्रवेशद्वारावर अपमानास्पद वागणूक

Published on

उल्हासनगर, ता. २७ (वार्ताहर) : उल्हासनगर महापालिकेच्या प्रवेशद्वारावर दिव्यांग बांधवांना सुरक्षा रक्षकांकडून आत येण्यास अडवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या घटनेमुळे शहरभर संतापाची लाट पसरली आहे. अपमानास्पद वागणूक देत दिव्यांगांची अवहेलना केली आहे. दिव्यांग कायदा २०१६चे उघड उल्लंघन झाल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्नील पाटील यांनी स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्ष आणि दिव्यांग क्रांती संघटना, माजी मंत्री बच्चू कडू यांच्या आदेशानुसार शुक्रवारी (ता. २८) महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

शासकीय कामकाजासाठी दररोज महापालिकेत येणाऱ्या दिव्यांग बांधवांना प्रवेशद्वारावरच अडवले जाते. आम्ही तुम्हाला आत सोडणार नाही, दोन दिव्यांग आधीच आत आहेत, ते बाहेर आल्यावरच प्रवेश मिळेल, अशा अपमानकारक वक्तव्यांमुळे त्यांचा स्वाभिमान सतत दुखावला जात असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. दिव्यांगत्व हा प्रवेश नाकारण्याचा आधार ठरल्याने हा स्पष्टपणे दिव्यांग कायद्याचा भंग असल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत प्रहार जनशक्ती पक्ष आणि दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे प्रधान सचिव (दिव्यांग कल्याण), महापालिका आयुक्त, तसेच मध्यवर्ती पोलिस ठाणे यांना तक्रारपत्र देण्यात आले आहे.
दरम्यान, हा मुद्दा सामाजिक आणि राजकीय पातळीवर तापण्याची चिन्हे दिसत असून, महापालिका प्रशासन, सुरक्षा यंत्रणा आणि पोलिस विभागाच्या भूमिकेवर आता सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. २८ नोव्हेंबरला होणाऱ्या ठिय्या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्ष, दिव्यांग क्रांती संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

आंदोलनाचा इशारा
संबंधित सुरक्षा रक्षकांवर तत्काळ शिस्तभंगाची कारवाई; तसेच दिव्यांगत्वाच्या कारणावरून जाणीवपूर्वक अपमान व प्रवेश नाकारल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे. मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com