मतदार याद्या बनवताना हेतुपूर्वक घोळ

मतदार याद्या बनवताना हेतुपूर्वक घोळ

Published on

मतदार याद्या बनवताना हेतुपूर्वक घोळ
भाजपचा भिवंडी पालिकेवर गंभीर आरोप!
भिवंडी ता. २७ (वार्ताहर) : भिवंडी महापालिकेच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या बनवताना पालिका कर्मचाऱ्यांनी आर्थिक हितसंबंध जोपासून हेतुपूर्वक घोळ घातला आहे, असा गंभीर आरोप भिवंडी भाजपचे शहराध्यक्ष रवी सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या घोळामुळे अनेक मतदारांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

पालिका कर्मचारी, भूभाग लिपीक आणि बीट निरीक्षक यांनी आर्थिक हितसंबंध जोपासत मतदार याद्यांमध्ये घोळ घातल्याचा आरोप भाजप शहराध्यक्ष रवी सावंत यांनी केला आहे. कार्यकर्त्यांनी याद्या तपासल्यानंतर अनेक नावे दुबार असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक प्रभागातील याद्या परस्पर इतर प्रभागात जोडून तेथील मतदारांवर अन्याय केला आहे. मानसरोवर येथील प्रभाग क्रमांक २२ मधील नावे प्रभाग क्रमांक १७ मध्ये समाविष्ट केल्याचा आरोप माजी सभागृहनेते श्याम अग्रवाल यांनी केला आहे.

बीएलओ फिरत असताना आमदार रईस शेख हे जबरदस्तीने काही नावे कमी करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप करण्यात आला. भाजपचे राष्ट्रीय महासचिव तरुण सुख यांचे सासरे जवाहरलाल खन्ना आणि मोतीलाल गुप्ता हे भिवंडीत कित्येक वर्षे राहत असताना, आमदार रईस शेख यांनी त्यांच्या नावांसह येथील ३०० नावे वगळण्यासाठी अर्ज केले आहेत.

घोळ घालणाऱ्यांवर कारवाई
मतदार याद्यांमध्ये घोळ घालणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शहराध्यक्ष रवी सावंत यांनी केली आहे. निवडणुका पारदर्शक व निकोप वातावरणात व्हाव्यात, यासाठी भाजपचे कार्यकर्ते दक्ष राहून लक्ष ठेवणार आहेत. घोळ घालणारे कर्मचारी दुबार मतदारांना अटकाव घालणार कसा, असा सवाल श्याम अग्रवाल यांनी उपस्थित केला आहे.

प्रभागांची तपासणी
प्रभागांच्या प्रारूप मतदार याद्या बनवताना प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून बनवणे गरजेचे होते, परंतु भूभाग लिपीकांनी आर्थिक फायद्यातून याद्या फोडण्याचे काम केले आहे. या पत्रकार परिषदेत भाजपचे पदाधिकारी श्याम अग्रवाल, ममता परमाणी, विठ्ठल बाफना, श्याम भोईर, प्रवीण मिश्रा, विकास बाफना, मोहन कोंडा, राजू गाजंगी आदी उपस्थित होते.

प्रभागांच्या सीमेवर काही प्रमाणात नाव फेरफार होतात ते स्वाभाविक आहे.पण जाणीवपूर्वक एका प्रभागातील नावे दुसऱ्या प्रभागात टाकले हे चुकीचे आहे.ज्या काही तक्रारी येत आहेत त्याची योग्य चौकशी करून सुधारणा करणार आहोत. -अजित महाडिक, सहाय्यक आयुक्त, पालिका निवडणूक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com