सत्ता आमच्याकडे असल्याने निधीही आम्हीच आणू

सत्ता आमच्याकडे असल्याने निधीही आम्हीच आणू

Published on

सत्ता आमच्याकडे असल्याने निधीही आम्हीच आणू
भाजपतर्फे उरणमध्ये मतदारांसमोर अजब दावा
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २७ : उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत लढणाऱ्या भाजपने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यातील दाव्याने तालुक्यात चर्चा रंगली आहे. केंद्रात आणि राज्यात विरोधकांची सत्ता नाही. त्यामुळे आम्हीच निधी आणून विकास करू शकतो, असा दावा भाजपने केला आहे. विरोधकांची सत्ता आल्यास त्यांना केंद्र व राज्याकडून निधी मिळणार नाही, असे अप्रत्यक्षरीत्या भाजपच्या दाव्यामुळे सांगितले जात आहे.
उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह २१ जागा स्वबळावर लढवत आहे. शिवसेनेच्या शिंदे गटासोबत सूत न जुळल्यामुळे मविआसोबत शिवसेनेला भाजपचे उमेदवार तोंड देत आहेत. उरणचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली उरण नगर परिषदेची निवडणूक होत आहे. महायुतीमधून शिवसेना बाहेर पडल्याने आता महेश बालदींविरोधात मविआ आणि शिवसेना अशी लढत निर्माण झाली आहे. या निवडणुकीत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रलोभने आणि आश्वासने दिली जात आहेत. भाजपकडून ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली जात असल्याचा नेहमी दावा करण्यात येत आहे. भाजपने प्रसिद्ध केलेल्या दाव्याप्रमाणे विकासाचे अनेक विविध मुद्देदेखील मांडले आहेत. मात्र विरोधी पक्षाकडे आमदार, खासदार नाहीत, केंद्रात आणि राज्यात सत्ता नाही. विकास निधीशिवाय कामे होणार नाहीत. मग विरोधक निधी कुठून आणणार आणि विकास कसा करणार, असे प्रश्न भाजपने उपस्थित केले आहेत. राज्यभरात सुरू असलेल्या निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नेत्यांकडून वारंवार राज्याची तिजोरी आमच्याकडे असल्याचा दावा केला जातो. तर तिजोरीच्या चाव्या आणि मालक आमचा असल्याने आमच्याच पक्षाला मतदान करा, अशी जणू काही स्पर्धा महायुतीच्या नेत्यांमध्ये लागली असल्याचे चित्र आहे. हाच धागा पडकत उरणमध्ये भाजपने महायुतीच्या नेत्यांचा कित्ता गिरवण्याची चर्चा पंचक्रोशीत रंगली आहे.
----------------------------------
विकास करण्यासाठी सत्ता नाही, मानसिकता लागते. तुमच्याकडे सत्ता असताना उरण नगर परिषदेत कचरा, रस्ते नियोजनात अपयशी आहात. एमआयडीसीचे बिल थकीत आहे. विजेचे नियोजन नाही. पाणीपुरवठा होत नाही, अशा समस्या का आहेत? विरोधी पक्षांची कामे होऊ देणार नाही. आमची सत्ता आल्यावर आम्हाला राज्यातून निधी देणार नाही का, असा त्याचा अर्थ होतो का, असे उरण नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भावना घाणेकर यांनी रोष व्‍यक्‍त केला. तर राज्यात आणि केंद्रात आमची सत्ता आहे. आमदार आणि खासदार आमच्याकडे आहेत. त्यामुळे त्यांच्या तुलनेत आम्ही अधिक विकास करू शकतो. एवढेच आम्हाला जनतेला सांगणे आहे. त्याचा विरोधकांना निधी आणू न देण्याचा संबंध नाही, असे उरणचे आमदार महेश बालदी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com