धुळीत हरवले ठाणे

धुळीत हरवले ठाणे
Published on

धुळीत हरवले ठाणे
प्रदूषणामुळे जनजीवनावर परिणाम
ठाणे शहर, ता. २७ (बातमीदार) ः हिवाळ्याची सुरुवात असतानाच ठाणे शहरावर दाट धुळीचे मोठे आक्रमण झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून नागरिकांना या प्रदूषणकारी धुळीचा सामना करावा लागत आहे. गुरुवारी (ता. २७) तर भर दिवसा शहरातील मुख्य रस्त्यांवर धुळीची जाड चादर पसरल्याने जनजीवन विस्कळित झाले.

शहरात विविध भागांत मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. यासाठी ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. घोडबंदर मार्गावर युटिलिटी डक्ट आणि रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी रस्ते खोदले जात आहेत. कासारवडवली भागात सर्वाधिक कामे सुरू आहेत, जिथे रस्त्यावर धुळीचे थर साचले आहेत. या प्रदूषणकारी धुळीमुळे नागरिकांना श्वास घेण्यासाठी त्रास होत आहे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांपैकी ३५ टक्के रुग्णांना श्वासनाचा त्रास असल्याच्या तक्रारी आहेत.

कमी दृश्यमानता
धुळीमुळे रस्त्यावर समोरचे दृश्य स्पष्ट दिसत नव्हते. त्यामुळे वाहनचालकांना भर दुपारीही वाहनांचे हेडलाइट चालू करून वाहने धीम्या गतीने चालवावी लागली. पसरलेल्या धुळीमुळे समोरची वाहने दिसणे कठीण झाले होते. याचा परिणाम वाहतुकीवर झाला. गायमुख घाटातील घोडबंदर वाहिनीवर दुपारच्या वेळेत याच धुळीमुळे दृश्यमानता कमी झाल्याने आणि चालकाचा ताबा गेल्याने एक मल्टी एक्सेल कंटेनर उलटला होता.

इमारती धुळीत गडप
शहरातील उत्तुंग इमारतीही या धुळीच्या चादरीत गडप झाल्यासारख्या दिसत होत्या. रस्त्याच्या कडेला असलेली घरे आणि दुकानेही धुळीने माखली आहेत.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचना
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहरातील धुळीच्या समस्येची गंभीर दखल घेतली आहे. ठाणे प्रदूषण नियंत्रण अधिकारी संजीव रेदासानी यांनी खालील निर्देश दिले आहेत. संबंधित विकसकांनी त्यांच्या कामाचे ठिकाण आणि परिसर पाण्याने धुवून काढतानाच, माती आणि राडारोड्याची वाहतूक करणाऱ्या डम्पर, ट्रकचे टायर धुवून स्वच्छ करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ठाणे महानगरपालिकेने धूळ साचलेले रस्ते पाण्याने स्वच्छ करावेत, असे निर्देशदेखील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. प्रदूषणामुळे वातावरणात दाटलेल्या धुळीचा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी प्रशासकीय कार्यवाही आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com