केईएम रुग्णालयात अत्याधुनिक क्रिडा वैद्यकीय विभाग

केईएम रुग्णालयात अत्याधुनिक क्रिडा वैद्यकीय विभाग

Published on

केईएम रुग्णालयात अत्याधुनिक क्रीडा वैद्यकीय विभाग
खेळांतून होणाऱ्या दुखापतींवर बहुउद्देशीय उपचार; मोफत सर्जरी व पुनर्वसनाची सुविधा
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांपैकी एक असणाऱ्या केईएम रुग्णालयात क्रीडा वैद्यकीय विभाग उभारण्यात आला आहे. नवीन इमारतीचा संपूर्ण बारावा मजला या विभागासाठी देण्यात आला असून जखमी खेळाडू, क्रीडाप्रेमी तरुण आणि दीर्घकालीन स्नायूदुखीने त्रस्त असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे, अत्याधुनिक मशिनरी आणि साहित्यांनी सुसज्ज असलेला या विभागात रुग्णांना मोफत उपचार दिले जाणार आहेत. खेळताना झालेल्या दुखापतींवर लागणाऱ्या शस्त्रक्रिया ही योजनेअंतर्गत मोफत केल्या जातील, असेही सांगण्यात आले. खासगी रुग्णालयांत साधारणपणे याच शस्त्रक्रियांसाठी दीड ते पाच लाख आणि पुनर्वसनाच्या एका प्रक्रियेसाठी किमान पाच हजार रुपये शुल्क आहे. केईएममध्ये ही सेवाही विनामूल्य असेल.
हे अत्याधुनिक विभाग जखमी खेळाडूंपासून सामान्य नागरिकांपर्यंत अनेकांना नवे आरोग्यसंकल्प देण्याच्या दिशेने मोठे पाऊल ठरेल, असा तज्ज्ञांचा विश्वास आहे. विभाग पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर अनेक सरकारी आणि खासगी खेळांच्या संघटनांसोबत सहकार्य केले जाईल.

केंद्रातील सुविधा
केंद्रात वातानुकूलित वॉर्ड, तीन स्वतंत्र शस्‍त्रक्रिया कक्ष आणि २५ खाटांचा रिहॅब वॉर्ड तयार करण्यात आला आहे. आधुनिक सुविधा या विभागामध्ये देण्यात येणार आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे खेळाडूंच्या हालचालींचे अचूक विश्लेषण करून जखमांचे कारण ओळखता येईल आणि त्यानुसार वैयक्तिक उपचार योजना तयार करता येते. झालेली दुखापत लवकर भरून खेळाडू पुन्हा खेळण्यासाठी सज्ज करण्यास हा विभाग महत्त्वाची भूमिका बजावेल.

बीके टायर्सचा मोठा निधी
या केंद्राच्या निर्मितीसाठी जवळपास २४ कोटी रुपयांचा खर्च झाला असून तो संपूर्णपणे बीके टायर्सकडून सीएसआर निधीतून करण्यात आला आहे. उद्योगक्षेत्रातून मिळालेल्या या पाठबळामुळे केईएममध्ये खासगी रुग्णालयांना लाजवेल, अशी सुविधा उभारली गेली आहे. ज्या सेवा बाहेर अव्वाच्या सव्वा किमतीत उपलब्ध होतात, त्या सेवा आता सर्वसामान्यांसाठीही मोफत उपलब्ध होतील, ही मोठी सामाजिक मदत मानली जात आहे.

लिफ्टची मुख्य समस्या
केंद्रात तांत्रिक अडचणी असून इमारतीतील लिफ्टची क्षमता कमी आहे. यामुळे, रुग्ण आणि नातेवाइकांच्या वाहतुकीत अडथळे निर्माण होतात. यावर रुग्णालय प्रशासनाने तात्पुरत्या उपाययोजना केल्या असून या समस्या मार्गी लावण्याची हमी दिली आहे.

उदयोन्मुख खेळाडूंना फायदा
या केंद्राचा सर्वाधिक फायदा शहरातील उदयोन्मुख खेळाडूंना होईल. कुपरेज मैदान, आझाद मैदान, शिवाजी पार्क आणि विविध क्रीडा केंद्रांवर सराव करणाऱ्या तरुणांच्या जखमांवर मोफत उपचार, मोफत तपासणी आणि मोफत पुनर्वसनाची सुविधा उपलब्ध होईल. गुडघा, खांदा, टाच, पाठीचे दुखणे, स्नायू ओढणे, लिगामेंट दुखापत अशा जखमांवर येथे अचूक निदान आणि उपचार मिळणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com