तांत्रिक बाबींमुळे रुग्णांची गैरसोय, रुग्णांना डिस्चार्ज, उपचारांसाठी निधीची मान्यता मिळण्यात अडचण,

तांत्रिक बाबींमुळे रुग्णांची गैरसोय, रुग्णांना डिस्चार्ज, उपचारांसाठी निधीची मान्यता मिळण्यात अडचण,

Published on

सरकारी योजनांचा सर्व्हर डाऊन
रुग्णांना उपचारांसाठी निधी मिळेना

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महाराष्ट्र शासनाची महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना या दोन्ही एकत्रित महत्त्वाच्या सरकारी योजनांचा सर्व्हर गेल्या काही दिवसांपासून डाऊन झाला आहे. बुधवार (ता. १९)पासून या महत्त्वाच्या वेबसाईटला अपडेट करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे रुग्णालयाशी संलग्न असणाऱ्या योजनेच्या वेबसाईटवरही परिणाम झाला आहे. त्याचा फटका रुग्णांना बसत आहे.
रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांना डिस्चार्ज मिळणे, उपचारांसाठी निधीची मान्यता मिळणे, प्रिओथ, रुग्णांचे ॲडमिशन होणे, अशा अनेक समस्या उद्भभवत आहेत. याचा सर्वाधिक त्रास केईएम रुग्णालयात या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या आरोग्य मित्र आणि इतर कर्मचाऱ्यांना होत असल्याचे सांगितले गेले. केईएम रुग्णालयातून दिवसाला किमान ३५ ते ४० डिस्चार्ज आणि ५० रुग्णांना उपचारांच्या निधीची सर्व रुग्णांचे अहवाल घेऊन मान्यता दिली जाते. रुग्णालयात गेल्या सहा दिवसांपासून ही समस्या उद्भवत आहे. सध्या आपत्कालीन स्थितीत शस्त्रक्रिया केली जात आहेत. सद्यःस्थितीत फक्त दोन ते तीन मिनिटे वेबसाईट सुरू झाल्याचे दिसते; पण पुन्हा ती बंद पडते. शिवाय, एका रुग्णासाठी एक ते दीड तास लागत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही परिस्थिती राज्यातील सर्वच रुग्णालयांमध्ये सारखी आहे. केईएम रुग्णालयाच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले, की रुग्णांच्या कागदपत्रांची प्रत स्कॅन करून एका पत्रानुसार डिस्चार्ज दिला जात आहे. रुग्णांचा डेटा वेबसाईटवर अपलोड करण्याचा बॅकलॉग खूप मोठा आहे.
रुग्णाची सर्व कागदपत्रे घेऊन त्याचा योजनेत सहभागी करून घेण्यासाठी किमान १५ मिनिटे लागत होती; पण आता वेबसाईट चालू-बंद होत असल्याने ही प्रक्रिया होत नाही किंवा उशिरा होते, अशी समस्या इथल्या कर्मचाऱ्यांना उद्भवत आहेत. ‘गेल्या आठ ते १० दिवसांपासून केईएम रुग्णालयातील योजनेच्या वेबसाईटचा सर्व्हर डाऊन आहे, यावर तत्काळ तोडगा काढला गेला पाहिजे,’ असे माजी नगरसेवक अनिल कोकीळ म्हणाले.
...
वेबसाईटची तांत्रिक समस्या दोन दिवसांत सोडवली जाणार आहे; मात्र रुग्णांची गैरसोय होऊ नये, त्यासाठीच्या सूचनाही संबंधित विभागांना दिल्या गेल्या आहेत. रुग्णांच्या उपचारांसाठी ईटीआयचा योग्य वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- आण्णासाहेब चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा फुले आणि आयुष्मान भारत योजना
...
औषधांसाठी लाखोंचा खर्च
समीर (बदललेले नाव) यांच्या पत्नीला जुळी मुले झाली असून त्यांचा सहभाग योजनेत झाला. सर्व्हर डाऊन असल्याने त्यांना निधीची मान्यता मिळाली नाही. त्यांची दोन्ही बाळे एनआयसीयू आणि पत्नी आयसीयूमध्ये आहे. त्यामुळे आतापर्यंत औषधांसाठी लाखो रुपये खर्च झाल्याचे समीर यांनी सांगितले. विरारहून आलेल्या ४५ वर्षीय महिलेचे किडनी प्रत्यारोपण झाले आहे. त्यासाठीची औषधे त्यांना परवडत नाहीत. गेल्या दोन दिवसांपासून त्यांची फाईल मान्यतेसाठी अडकली आहे.
...
फक्त शस्त्रक्रियेसाठी ईटीआय
हृदयविकाराच्या आपत्कालीन स्थितीत असणाऱ्या रुग्णांची शस्त्रक्रिया ऑफलाइन म्हणजेच ईटीआय करण्याची तत्काळ परवानगी देण्यात आली आहे. औषधांचा अतिरिक्त खर्च रुग्णांना स्वखर्चातून करावा लागत आहे. गेल्या दोन दिवसांपासून रुग्णांना निधीअंतर्गत मान्यता मिळाली नसल्याचेही सांगितले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com