ठाण्यात भटक्या कुत्रे गायब होण्यावरून संशय

ठाण्यात भटक्या कुत्रे गायब होण्यावरून संशय

Published on

भटकी कुत्री पकडणाऱ्यांवर कारवाई
तातडीने चौकशी करण्याची नरेश म्हस्के यांची मागणी

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : ठाणे परिसरातील काही भागांत भटक्या कुत्र्यांना पकडण्याच्या घटना घडत आहेत. अज्ञात खासगी संस्थांकडून त्यांना उचलून नेण्याच्या घटना समोर येत आहेत. नागरिकांकडून याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. काही खासगी रुग्णवाहिका रात्री किंवा सकाळच्या सुमारास परिसरात येत असून, भटकी कुत्री आणि इतर प्राणी उचलून नेत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे या तक्रारींची दाखल घेऊन ठाणे पालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने चौकशी करावी, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली.
ठाणे पालिकेच्या आरोग्य विभागातील विविध उपक्रमांसह ‘पेट केअर ठाणे’ सॉफ्टवेअरचे डिजिटल उद्घाटन खासदार म्हस्के यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २८) झाले. त्या वेळी त्यांनी परिसरातील अनेक भटकी कुत्री उचलून नेत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारींचा उल्लेख केला. काही खासगी संस्था, प्राणी रुग्णालये आणि निर्बीजीकरण करणाऱ्या पथकांकडून ठाण्यातील भटकी कुत्री मुंबईतील देवनार भागात नेली जात असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या काही नागरिकांना ‘तुम्ही यात लक्ष घालू नका’ असे धमकीवजा फोनदेखील आल्याचे समोर आले आहे, असेही त्यांनी सांगितले.
भटक्या प्राण्यांना अनधिकृतपणे पळवून त्यांच्या अवयवांच्या तस्करीचादेखील प्रकार असल्याची शक्यता नागरिकांकडून वर्तविण्यात आली आहे. या घटनेत काही उत्तर भारतीय टोळ्या सहभागी असू शकतात, असे म्हस्के यांनी सांगितले. संबंधित तक्रारी आपल्या निदर्शनास आल्या असून महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने या प्रकरणात लक्ष घालणे आवश्यक असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी या वेळी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com