मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांचा राजीनामा...

मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांचा राजीनामा...

Published on

मनसेचे जिल्हाध्यक्ष
भोईर यांचा राजीनामा
कल्याण-डोंबिवलीत मनसेला धक्का
डोंबिवली, ता. २८ ः मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी शुक्रवारी (ता. २८) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहीत आपला राजीनामा दिला. भोईर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. पालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पक्षाला रामराम केल्याने मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी हानी झाल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासमवेत एका कार्यक्रमाप्रसंगी भोईर उपस्थित असल्याने ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
समाजकारण आणि राजकारणातील आपला संपूर्ण प्रवास मार्गदर्शक, सहकारी कार्यकर्ते, नागरिक व हितचिंतक यांच्या भावनांचा आदर करत पार पडल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. सर्वांच्या सल्ल्यानुसार आणि जड अंतःकरणाने पक्षातून मुक्त होण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मनसेतील सहकाऱ्यांकडून आणि नेतृत्वाकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली आहे.
हे पत्र त्यांनी आपल्या सोशल मीडियावरून प्रसिद्ध केले आहे. भोईर यांच्या पत्नी तथा माजी नगरसेविका सरोज भोईर यादेखील पक्षाला रामराम करतील व भोईर यांच्यासोबत काही माजी नगरसेवक तसेच त्यांचे खंदे कार्यकर्ते हेदेखील पक्षातून बाहेर पडतील, असे बोलले जात आहे.
दरम्यान, भोईर यांच्या राजीनाम्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रभागातील विकासकामांचे भूमिपूजन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडले होते. त्या वेळी पक्षाच्या घोषणा देण्यात आल्या; मात्र भोईर हे शांत उभे होते. आपल्या भाषणात चव्हाण यांनी लवकरच भोईर हेदेखील घोषणा देतील, अशी कोपरखळी त्यांना मारली होती. त्यावरून भोईर-भाजप समीकरणांना उधाण आले होते. आता राजीनाम्याच्या निर्णयामुळे या चर्चेला आणखी बळ मिळाले आहे. मनसेकडून आतापर्यंत यावर अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. प्रकाश भोईर यांच्याशीदेखील सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com