कर्जतचा विकास भकास होईल; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वक्तव्य

कर्जतचा विकास भकास होईल; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वक्तव्य

Published on

परिवर्तन विकास आघाडीच्या
जाहीरनाम्याचे प्रचारसभेत लोकार्पण

कर्जत, ता. २८ ः कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रचाराची लाट उसळली आहे. शुक्रवारी (ता. २८) झालेली टिळक चौकातील परिवर्तन विकास आघाडीची सभा प्रचाराचे आकर्षण ठरल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पाठिंब्याने नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पुष्पा दगडे यांच्या सभेला नागरिकांची गर्दी झाली होती. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. या वेळी परिवर्तन विकास आघाडीच्या जाहीरनाम्याचे लोकार्पण अजित पवार यांच्या हस्ते झाले.
सभेत बोलताना अजित पवार यांनी कर्जतच्या प्रश्नांवर भाष्य करीत आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर जोरदार टीका केली. कर्जतमध्ये नऊ कोटींचा पूल सुरू केला, पण ठेकेदारच पळून गेला. काही लोकप्रतिनिधी पहिल्यांदाच ठेकेदाराला असा झटका देतात, की तो कामालाच तयार होत नाही. मग विकासकामे कशी पूर्ण होतील, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ते म्हणाले, ‘पुष्पाताई साध्या कुटुंबातील आहेत. ५५ महिला बचत गटांना सक्षम करण्याचे काम त्यांनी केले आहे. महिलांसाठी ‘लाडकी बहीण’ योजना आम्ही राज्यभर राबवत आहोत. कर्जतसारखे शहर वेगाने वाढत आहे, जवळच विमानतळ उभे राहत आहे. अशा वेळी योग्य नेतृत्वाची गरज अत्यावश्यक आहे. येथील विकास न झाल्याने कर्जत भकास होईल. कर्जतच्या नदीसह वीज-पाणीप्रश्नांवर व्यापक काम करणे आवश्यक आहे. आमच्या उमेदवारांना संधी द्या, शहराचे रुपडे बदलू. या सभेला मोठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती होती. कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीत या सभेमुळे जोरदार ऊर्जा मिळाली असून, आगामी लढत अधिक चुरशीची होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
..................................
डीएनएबद्दल बोलणाऱ्यांना त्याचा फुलफॉर्मही माहीत नाही, असा थेट आरोप तटकरे यांनी केला. येथील मुख्य रस्ते, नदीवर दहिवली बांधारा ही सर्व कामे अजितदादांच्या माध्यमातून झाली. मात्र आजही पिण्याचे पाणी, नाट्यगृह, आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. एका वर्षात आम्ही कर्जतला नाट्यगृह उभारू, असे त्यांनी जाहीर केले. पुष्पाताईंना मी स्वतः मतांची याचना करतो आहे. सुरुवात तुम्ही केली, शेवट मला करू देऊ नका.
- प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com