विक्रमगड तालुक्यात भात झोडणी अंतिम टप्पात

विक्रमगड तालुक्यात भात झोडणी अंतिम टप्पात

Published on

भातझोडणीसाठी मजुरांची टंचाई
विक्रमगडमध्ये भातझोडणी अंतिम टप्प्यात; पावसामुळे रखडलेली कामे एकाचवेळी सुरू
विक्रमगड, ता. २९ (बातमीदार) : निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच मेटाकुटीस आलेल्या विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता आता मजूरटंचाईमुळे वाढली आहे. तालुक्यातील मलवाडा, आलोंडे, साखरा, पाचमाड, तलवाडा यांसारख्या विविध परिसरांत भातझोडणीची कामे आता अंतिम आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात आली आहेत.
दिवाळीत झालेल्या अवकाळी पावसामुळे भात पिकाची मोठी नासाडी झाली होती, परिणामी शेतीची कामे वेळेवर होऊ शकली नाहीत. आता पावसाने उघडीप दिल्याने, शेतकऱ्यांना उरलेले पीक वाचवण्यासाठी रखडलेली भातझोडणीची कामे एकाचवेळी हाती घ्यावी लागली आहेत. या कामांमुळे तालुक्यात मजुरांची मोठी चणचण भासत असून, बळीराजा त्रस्त झाला आहे. भातकापणीसाठी वाढीव मजुरी देऊन कशीबशी कापणी पूर्ण केल्यानंतर, आता झोडणीसाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे.
खेडोपाडी शेतकरी थंडीत भल्या पहाटेच शेतात खळा तयार करून झोडणीच्या कामाला सुरुवात करत आहेत. दोनशे ते पाचशे भाताच्या भाऱ्यांची गोलाकार उडवी रचून सकाळी १० वाजेपर्यंत ते झोडण्याचा प्रयत्न करतात. मनुष्यबळ कमी असल्यास दुपारच्या जेवणानंतर पुन्हा काम सुरू होते. उन्हात झोडणी केल्यास पेंढ्यामुळे अंगाला खाज सुटण्याचा धोका असल्याने सकाळी आणि संध्याकाळी कामे उरकली जातात.
शेतकरी दरवर्षी निसर्गाचा लहरीपणा, पिकांची नासधूस, मजुरीतील वाढ, मजुरांची कमतरता आणि खता-बियाणांचे वाढलेले दर सहन करत आहेत. शेवटी शेतमालाला मिळणारा अल्प हमीभाव पाहता, नाइलाजास्तव शेती करावी लागत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.
------------------
सद्यस्थितीत विक्रमगड तालुक्यात भातझोडणी अंतिम टप्प्यात आली आहे. काही भागात भातझोडणी झाली आहे. मजुरांची कमतरता, वाढती मजुरी, भातबियाणे, खते, औषधे याचे वाढते भाव, निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान त्या मानाने भाताला अत्यल्प हमी भाव यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
- कमलाकर भोईर, शेतकरी, मलवाडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com