क्रीडा संकुलाच्या पुर्ण उभारणीला लवकरच सुरुवात
डोंबिवलीतील क्रीडा सुविधांना नवे बळ
डोंबिवलीतील ह.भ.प. सावळाराम क्रीडा संकुलाचा कायापालट
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २९ ः येथील हभप संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलाचा प्रलंबित विकास प्रकल्पाला गती मिळाली असून सुमारे १८० कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी मिळाली आहे. यामुळे लवकरच आता या कामाला सुरुवात होणार असून पंचवीस हजार चौमी क्षेत्रफळाची अत्याधुनिक सोयीसुविधांयुक्त बहुमजली क्रीडा इमारत उभारली जाणार आहे. हे संकुल जिल्ह्यातील खेळाडूंसाठी मोठे केंद्र ठरणार आहे.
डोंबिवली शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या क्रीडा संकुलात संपूर्ण जिल्ह्यातून खेळाडू विविध मैदानी खेळांच्या सरावासाठी येत असतात. याच खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सरकारकडे निधीची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या क्रीडा संकुलाच्या विकासासासाठी निधी मंजूर केला. या निधीच्या माध्यमातून क्रीडा संकुलात विविध अत्याधुनिक सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. नव्या प्रकल्पात बहुमजली क्रीडा इमारतीसह विविध क्रीडा प्रकारांसाठी स्वतंत्र सोयी उपलब्ध होणार आहेत. पहिल्या टप्प्यात इंडोअर क्रीडासंकुल आणि ऑलिंपिक मानकांचा तरणतलाव बांधण्याचे नियोजन असून पुढील टप्प्यात मोठ्या क्षमतेचे स्टेडियम उभारले जाईल.
‘या’ शहरांमध्ये क्रीडा संकुल
क्रीडा सुविधांमध्ये अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, कळवा, दिवा, मुंब्रा या शहरांमध्ये खेळाडूंसाठी अद्ययावत सुविधा आणि सुसज्ज साहित्य असलेली क्रीडा संकुलांचा समावेश आहे. याच अंतर्गत अंबरनाथ येथे शूटिंग रेंज क्रीडा संकुल ऑलिंपिक दर्जाचा तरण तलाव, उल्हासनगर शहरात क्रीडा संकुल, डोंबिवलीत क्रीडा संकुल, कळवा, मुंब्रा आणि दिवा या शहरांमध्ये खेळाडूंसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर कळवा येथे ऑलिंपिक दर्जाच्या तलावाचे नूतनीकरण आणि क्रीडा संकुलात विविध सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. या नव्या प्रकल्पामुळे हा विस्तार आणखी बळकट होणार असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धांची तयारी करताना खेळाडूंना मोठा फायदा होणार आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे संकुल
या संकुलाची उभारणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या निधीतून केली जाणार असून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याचे व्यवस्थापन कल्याण-डोंबिवली पालिकेकडे सोपवण्यात येणार आहे. प्रस्तावित संकुलामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा तरणतलाव, डायव्हिंग पूल, विशाल पार्किंग, जिमनॅस्टिक, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कराटे, मार्शल आर्ट, स्क्वॅश, स्नुकर आणि शूटिंग रेंजसह विविध खेळांसाठी अत्याधुनिक हॉल्स, आधुनिक फिजिओथेरपी केंद्र, बॅक्वेट हॉल्स, निवास व्यवस्था आणि बहुपयोगी सभागृहाचा समावेश असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

