दहा कातकरी कुटुंबांचा ‘बयाना माफ’

दहा कातकरी कुटुंबांचा ‘बयाना माफ’

Published on

पालघर, ता. २९ (बातमीदार) : आदिवासी, कातकरी समाजाच्या उद्धारासाठी श्रमजीवी संघटना लढा देत आहे. संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, संस्थापक विवेक पंडित, संस्थापिका विद्युल्लता पंडित यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांच्या मदतीने कातकरी कुटुंबांचे बंधनकारक श्रमात अडकणे टळून त्यांच्या हक्कांचे संरक्षण हाेण्यासाठी मदत झाल्याची घटना समोर आली आहे. टाकवहाळ येथील कातकरी समाजातील दहा कुटुंबांना बयाना पद्धतीने वीटभट्टीवर नेण्याचा होत असलेला प्रयत्न रोखण्यात यश मिळाले.

पालघर तालुक्यातील टाकवहाळ गावातील रिंजडपाड्यामध्ये गुरुवारी (ता. २७) सकाळीच कातकरी वस्तीत वेढी येथील वीटभट्टी मालकाने कामासाठी कातकरी समाजातील कुटुंबांना नेण्यासाठी गाडीसह चालकाला पाठवले होते. तसेच कामगारांना घेण्यास पाठविले होते; परंतु त्या वेळी कातकरी कुटुंबांनी ‘भाऊंनी सांगितलंय, आमचा बयाना माफ झालाय’ असे सांगत कामावर जाण्यास स्पष्ट नकार दिला. परिणामी, चालकाला रिकामी गाडी घेऊन परत जावे लागले.

ही घटना समजताच वीटभट्टी मालकाने प्रतिज्ञापत्र लिहून दिले. तसेच बयाना पद्धत गुन्हा असल्याचे मान्य केले. बयाना दिलेली रक्कम माफ करणे, मजुरांना केवळ रोकड मजुरीवर घेणे, हिशेब कायदेशीर दराने व संघटनेच्या देखरेखीखाली करणे, कोणतीही जबरदस्ती न करणे, फसवणूक न करणे तसेच मजुरीत कोणतीही कपात न करणे, या सर्व बाबींची स्पष्ट हमी त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिली आहे. तसेच आपल्यासोबत कामावर नेणाऱ्या सर्व मजुरांची नावे व पत्ते प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहेत.

ठाण्यातील भाषणाचे पडसाद
‘श्रमजीवी’चे ठाणे येथील दोन दिवस आत्मक्लेशातून निर्धार मोर्चातील विवेक पंडित यांच्या भाषणाचे पडसाद टाकवहळ रिंजडपाड्यातील गाव कमिटीच्या बैठकीत महिला कार्यकर्त्या प्राची सवरा यांचाद्वारे उमटले. काही कातकरी कुटुंबांनी घेतलेल्या बयान्याचा मुद्दा मांडला. या माहितीची गंभीर दखल घेत तालुकाध्यक्ष उल्हास पाटील आणि सचिव हिना वनगा यांनी तातडीने तपास सुरू केला होता. या कामगिरीमध्ये संघटनेचे शंकर वरखंडे, रेणुका पागी, प्राची सवरा, वामन वावरे, कल्पेश वावरे, लक्ष्मण वायडा, राम गरेल यांनी भूमिका बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com