श्रीवर्धन नगरपरिषदेत ठाकरे शिवसेनेची उदासीनता
श्रीवर्धन नगरपरिषदेत ठाकरे शिवसेनेची उदासीनता
स्टार प्रचारक गैरहजर; प्रचाराची धुरा पूर्णपणे कार्यकर्त्यांवर
श्रीवर्धन, ता. २९ (वार्ताहर) ः श्रीवर्धन नगरपरिषद निवडणुकीची घोषणा होताच सर्वच प्रमुख पक्षांनी सत्ता काबीज करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. प्रतिष्ठेची मानली जाणारी ही निवडणूक लक्षात घेता, विविध पक्षांनी उमेदवारांची काटेकोर पारख करूनच नगराध्यक्षपद आणि नगरसेवक पदांसाठी चेहरे घोषित केले. उमेदवार जाहीर होताच प्रचारफेरींना वेग आला असून, अनेक पक्षांचे नेते व मंत्री मैदानात उतरले आहेत. मात्र ठाकरे शिवसेनेची उदासीनता दिसन येत आहे. स्टार प्रचारकांनी गैरहजेरी लावल्याने संपूर्ण धुरा कार्यकर्त्यांवर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंत्री आदिती तटकरे व आमदार भरत गोगावले यांनी आपल्या उमेदवारांच्या पाठिशी उभे राहत घराघरात संपर्क साधला तसेच कॉर्नर सभा घेऊन मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. परंतु, याउलट ठाकरे यांच्या शिवसेनेची प्रचार मोहीम मात्र ठळकपणे उदासीन दिसून येत आहे. पक्षाचा एकही स्टार प्रचारक अजूनपर्यंत श्रीवर्धनमध्ये न पोहोचल्याने कार्यकर्ते आणि स्थानिक उमेदवारांवरच संपूर्ण प्रचाराची धुरा आली आहे. निवडणूक जाहीर होण्याआधीच राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला रोखण्यासाठी ठाकरे गटातर्फे विविध रणनीती आखण्यात आल्याच्या बातम्या होत्या. नगरपरिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात जाऊ नये, यासाठी वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांची उपस्थिती अपेक्षित होती. मात्र, प्रत्यक्षात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या निवडणुकीला अपेक्षित तेवढे महत्त्व न दिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. महाविकास आघाडीत शिवसेनेला नगराध्यक्षपदासह बारा जागा देण्यात आल्या असून, काँग्रेसला तीन जागा मिळाल्या आहेत. तरीही आघाडीच्या संयुक्त प्रचारात चमकदार नेतृत्वाचा अभाव जाणवत आहे. स्टार प्रचारक गैरहजेरीमुळे उमेदवारांनी स्वतःच्या बळावर मतदारांपुढे जाण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले असून, कार्यकर्तेही उत्साहाने प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.
.................
आघाडीतील विसंवादामुळे संभ्रम
राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्षपदासह सहा नगरसेवक उमेदवारांची घोषणा करून प्रारंभीच जोरदार तयारी दाखवली आहे. दुसरीकडे, शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्यात मनोमिलनाच्या चर्चांना उधाण आले असतानाच मनसेचा श्रीवर्धनमधील एकमेव नगरसेवक उमेदवार मात्र स्वतंत्र प्रचारफेरी करताना दिसत आहे. स्वपक्षीय कार्यकर्त्यांसह राबविलेली त्याची प्रचारमोहीम स्थानिक पातळीवर चर्चेचा विषय ठरत आहे. मनसे उमेदवाराची स्वतंत्र धडाकेबाज प्रचारफेरी आणि आघाडीतील विसंवादामुळे मतदारांमध्येही संभ्रम निर्माण झाल्याचे वातावरण आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

