प्रदूषणकारी विकसकांचे बांधकामांना रोख

प्रदूषणकारी विकसकांचे बांधकामांना रोख

Published on

प्रदूषणकारी विकसकांचे बांधकामांना रोख
सकाळच्या दणक्यानंतर नवी मुंबई महापालिका आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २९ : पनवेल महापालिकेच्या हद्दीत प्रदूषण नियंत्रण मंडळाने आखून दिलेल्या नियमांचे भंग करणाऱ्या विकसकांवर महापालिकेतर्फे कठोर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत सकाळने धुळिकणांचे आक्रमण या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीनंतर महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी नोटीसा बजावलेल्या बांधकामांची पाहणी करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. त्यांनी केलेल्या पाहणीनंतर ज्या विकसकांनी प्रदूषण नियंत्रण करण्याबाबत उपाय-योजना केल्या नसतील, अशा विकसकांचे बांधकाम थांबवण्याची कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त मंगेश चितळे यांनी सकाळशी बोलताना स्पष्ट केले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या हवा प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण संवर्धनाबाबतच्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी निर्देश दिले आहेत. ज्या ठिकाणी प्रदूषणाची पातळी खालावली आहे, अशा ठिकाणचे बांधकाम बंद करण्याच्या सूचना महापालिकांना दिल्या आहेत. पनेवल महापालिकेने याआधी विकसकांना फक्त नोटिसा बजावल्या होत्या. मात्र त्यानंतरही अनेक विकसकांनी राजरोस प्रदूषणाच्या नियमांना बगल देत बांधकाम सुरूच ठेवले होते. याबाबत सकाळने १७ नोव्हेंबरला बातमी प्रकाशित करून प्रदूषणकारी विकसकांची पोलखोल केली. या बातमीनंतर पनवेल महापालिका प्रशासन सक्रिय झाले आहे. बांधकाम स्थळी जाऊन निरीक्षण, तपासणी आणि कारवाईची मोहीम राबविण्याच्या सूचना आयुक्त मंगेश चितळे यांनी दिल्या आहेत. या मोहिमेचा एक भाग म्हणून २७ नोव्हेंबरला कामोठे आणि खारघर प्रभाग समिती क्षेत्रातील विविध बांधकाम स्थळांची पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान उप आयुक्त स्वरूप खारगे यांनी हवा प्रदूषण नियंत्रणासाठी उच्च न्यायालयाने निर्धारित केलेल्या १५ मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे बांधकाम स्थळांवरील उपाययोजनांची प्रत्यक्ष तपासणी केली.
-----------------------------
सेन्सर आधारित मॉनिटरची कमतरता
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळाला जोडलेले सेन्सर अधारित मॉनिटर दर्शनी भागात लावण्याचा महत्त्वाचा नियम आहे. या मॉनिटरमुळे बांधकामाच्या ठिकाणी होणाऱ्या वायुप्रदूषणाची योग्य माहिती मिळण्यास मदत होणार आहे. मात्र अनेक ठिकाणी विकसकांनी हे मॉनिटर्स लावलेले नाहीत. स्थळ पाहणी करण्यासाठी गेलेल्या पथकांतील अधिकाऱ्यांनी सोयीप्रमाणे हे मॉनिटर नजरेतून बाजूला केले.
------------------------------------
बांधकाम क्षेत्राची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून प्रदूषण करणाऱ्या विकासकांचा अहवाल प्रशासनाने तयार केला आहे. अशा विकासकांवर सोमवारपासून काम बंद करण्याची कारवाई केली जाणार आहे.
-मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com