सरकारी कामात लाच मागणाऱ्यांविरुद्ध आता करा थेट तक्रार

सरकारी कामात लाच मागणाऱ्यांविरुद्ध आता करा थेट तक्रार

Published on

सरकारी कामासाठी लाच मागणाऱ्यांविरुद्ध आता करा थेट तक्रार
नवी मुंबई अँटी-करप्शनने सुरू केला नवा हेल्पलाइन नंबर
नवी मुंबई, ता. २९ (वार्ताहर) : नवी मुंबईतील शासकीय कामकाज पारदर्शक, जलद आणि नागरिकांसाठी अनुकूल व्हावे तसेच सरकारी यंत्रणेमधील वाढत्या भ्रष्टाचाराला प्रभावी आळा बसावा, या उद्देशाने अँटी-करप्शन ब्युरोच्या नवी मुंबई युनिटने एक विशेष हेल्पलाइन क्रमांक ९९२०३५१०६४ सुरू केला आहे. सरकारी कामांदरम्यान कुणीही लाचेची मागणी केल्यास थेट तक्रार करण्यासाठी हा नंबर नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
नवी मुंबईमध्ये नागरिकांना विविध शासकीय कार्यालयांमध्ये कामानिमित्त सतत भेट द्यावी लागते. अनेकदा कर्मचारी किंवा मधल्या दलालांकडून लाचेची मागणी केल्याशिवाय कामे पूर्ण होत नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असतात. अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यासाठी नवी मुंबई अँटी-करप्शन युनिटने हा हेल्पलाइन नंबर सुरू केला असून, तक्रार प्रक्रिया आता अधिक सोपी, वेगवान आणि पारदर्शक झाली आहे. या हेल्पलाइनचे उद्घाटन अँटी-करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक शिवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नवी मुंबई युनिटचे पोलिस उपअधीक्षक धर्मराज सोनके, पोलिस निरीक्षक सुधीर निकम, किरणकुमार वाघ आणि अरुंधती येळवे उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना पोलिस अधीक्षक शिवराज पाटील म्हणाले, की भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई ही केवळ सरकारी यंत्रणेची नाही; यात प्रत्येक नागरिकाने सहभाग घ्यावा. जागरूक नागरिक हेच सुशासनाचे मूळ बळ आहे. त्यामुळे नागरिकांना कुठेही, केव्हाही लाच मागितल्यास निःसंकोचपणे तक्रार करण्याचे आवाहन केले. पोलिस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांनी सांगितले, की सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच मागत असल्याचे दिसल्यास नागरिकांनी तत्काळ हेल्पलाइन ९९२०३५१०६४ वर संपर्क साधावा. तक्रारदारांची गोपनीयता पूर्णपणे जपली जाईल.
...................
चौकट
अँटी-करप्शन ब्युरो, नवी मुंबई युनिट - तक्रार करण्यासाठी संपर्क :
नवा हेल्पलाइन क्रमांक : ९९२०३५१०६४
टोल फ्री : १०६४
दूरध्वनी : ०२२-२७८३३३४४
ऑनलाइन तक्रार : acbmaharashtra.gov.in / acbmaharashtra.net

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com