उरण नगरपालिका निवडणूकपूर्वी वाहतूक शिस्त मोहिमेला वेग

उरण नगरपालिका निवडणूकपूर्वी वाहतूक शिस्त मोहिमेला वेग

Published on

उरण नगरपालिका निवडणुकीपूर्वी वाहतूक शिस्त मोहिमेला वेग
मद्यपी वाहनचालकांवर पोलिसांची करडी नजर; मार्ग शिस्तीसाठी विशेष प्रबोधन
उरण, ता. २९ (वार्ताहर) : उरण नगरपालिका निवडणूक २०२५ जवळ येत असल्याने शहरात शांतता, कायदा-सुव्यवस्था आणि वाहतूक शिस्त निश्चित करण्यासाठी उरण वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. वाढत्या वाहतुकीला नियंत्रित करणे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारी अनावश्यक गर्दी कमी करणे आणि नागरिकांचे प्राणरक्षण सुनिश्चित करणे या उद्दिष्टांनी वाहतूक विभागाने शहरात गस्त वाढवली आहे. प्रमुख चौक, बाजारपेठा आणि शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर स्वतंत्र पथके तैनात करून पोलिसांनी नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाईस सुरुवात केली आहे.
उरण वाहतूक पोलिसांनी केवळ दंडात्मक कारवाई न करता वाहनचालकांना वाहतूक सुरक्षेबाबत ‘प्रबोधन’ करण्यावर भर दिला आहे. विशेषतः दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांना चूक समजावून देत ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’मुळे होणाऱ्या अपघातांचे धोके स्पष्ट करण्यात आले. वाहन चालवताना मोबाईलचा वापर, रस्त्यावर अनियमितरीत्या वाहन उभे करणे, हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर न करणे, अतिवेगाने वाहन चालवणे अशा प्रकारचे नियमभंग आढळल्यास कडक दंड आणि आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. यादरम्यान वाहतूक पोलिसांनी नागरिकांना अपघातग्रस्तांना मदत करण्याचे मौल्यवान प्रशिक्षण दिले. अपघातानंतरचा ‘गोल्डन अवर’ किती महत्त्वाचा असतो याची माहिती देत जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवावे, अशी सूचना करण्यात आली. तत्काळ मदत मिळावी म्हणून १००, ११२, १०८ किंवा १०३३ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
......................

शहरात सुरू असलेल्या या मोहिमेमुळे वाहतुकीत शिस्त दिसू लागली असून, नागरिकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. निवडणुकीपूर्वी आणि नंतरही शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी सर्वांनी नियमांचे स्वयंस्फूर्तीने पालन करावे, असे आवाहन उरण वाहतूक पोलिस निरीक्षक अतुल दहिफळे यांनी केले. ही मोहीम पुढील काही दिवस अधिक कठोरपणे राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com