डोंबिवलीत मनसेला मोठा धक्का
डोंबिवलीत मनसेला मोठा धक्का
जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांसह दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३० ः कल्याण-डोंबिवलीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या संभाव्य युती आणि जागावाटपाच्या चर्चेला वेग आला असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा राजकीय धक्का बसला आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका सरोज भोईर आणि माजी नगरसेवक सुदेश चुडनाईक यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
डोंबिवली पश्चिमेतील उमेशनगर मैदानात रविवारी सकाळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. चव्हाण यांचे शेजारी आणि मित्र म्हणून ओळखले जाणारे मनसेचे नेते राजू पाटील यांना चव्हाणांनी दिलेला हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. मनसेचा प्रमुख चेहरा मानले जाणारे भोईर भाजपमध्ये गेल्याने कल्याण-डोंबिवलीतील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.
मनसेवरील उघड नाराजी
पक्षप्रवेशावेळी भाषणात प्रकाश भोईर यांनी मनसेवर उघडपणे नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, मी ज्या पक्षात होतो, तिथे मला प्रेम मिळाले; पण कार्यकर्त्यांनी खांदे टाकले तर नेतृत्वाने काय करायचं? ज्या पक्षात कार्यकर्तेच नाहीत, तो पक्ष चालणार तरी कसा? भोईर दाम्पत्य स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांशी भक्कम नाते असलेले आणि जनाधार असलेले नेते म्हणून ओळखले जातात.
भाजपची ताकद वाढली
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भोईर यांच्या प्रवेशाचे स्वागत केले. ते म्हणाले, प्रकाश भोईर, सरोज भोईर आणि सुदेश चुडनाईक यांचा प्रवेश हा भाजपची ताकद वाढवणारा आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये जे ग्रहण आहे, ते येणाऱ्या काळात दूर करायचे असेल, तर नागरिकांनी भाजपला साथ द्यावी.
भोईर दाम्पत्याचा राजकीय प्रवास
२००० व २००५ : शिवसेना पक्षातून नगरसेवक म्हणून निवडून आले.
२०१० : शिवसेनेला सोडचिठ्ठी देत अपक्ष निवडणूक लढवली. यात सरोज भोईर अपक्ष नगरसेविका म्हणून निवडून आल्या.
२०१५ : मनसेमध्ये प्रवेश केला आणि मनसेच्या तिकिटावर हे दाम्पत्य निवडून आले. मनसेने त्यांना मनपाचे विरोधी पक्षनेतेपद दिले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

