डहाणू–बोर्डी बीचवर ७ डिसेंबरला भव्य बीच मॅरेथॉन आणि महास्वच्छता अभियान
डहाणू–बोर्डी समुद्रकिनारी भव्य मॅरेथॉन आणि महास्वच्छता अभियान
१० हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग अपेक्षित; गिनिज वर्ल्ड रेकॉर्डचा संकल्प
कासा, ता. ३० (बातमीदार) : डहाणू–बोर्डी समुद्रकिनाऱ्यावर येत्या शुक्रवारी (ता. ७) बीच मॅरेथॉन आणि बीच क्लीन-अप ड्राईव्ह हा संयुक्त उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमातून गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या मोहिमेत तीन हजार धावपटू आणि आठ हजार स्वयंसेवकांसह १० हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग अपेक्षित असून १८ किलोमीटरच्या किनारपट्टीवर साचलेला प्लास्टिक कचरा गोळा करून अडीच ते तीन टन प्लास्टिक कचरा एका दिवसात संकलित करण्याचे उद्दिष्ट आहे.
१८ किलोमीटरची किनारपट्टी १० झोनमध्ये विभागली गेली आहे. प्रत्येक ठिकाणी स्वयंसेवकांची पथके तैनात असतील. या उपक्रमात एनसीसी–एनएसएस विद्यार्थी, शाळा–महाविद्यालये, स्थानिक ग्रामस्थ, मच्छीमार आणि पर्यावरण कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण आणि वजन करण्याची संपूर्ण प्रक्रिया गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या निकषांनुसार केली जाणार आहे.
जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनी नागरिकांनी ''गार्डियन्स ऑफ नेचर'' म्हणून पुढे यावे, असे आवाहन केले आहे. तसेच, मेजर जनरल विवेक त्यागी (एडीजी, एनसीसी) यांनी सर्व एनसीसी विद्यार्थ्यांना या राष्ट्रीय स्वच्छतेच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
तीन विभागांत आयोजन
५ किमी – वेव्ह रन
१० किमी – मॅंग्रोव्ह रन
२१ किमी – ब्ल्यू प्लॅनेट हाफ मॅरेथॉन
मोहीमेतून जनजागृती
समुद्री कासवे आणि जैवविविधतेसाठी धोकादायक ठरणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याची जाणीव नागरिकांना करून देणे आणि किनारा संरक्षण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. गोळा झालेला कचरा अधिकृत संस्थांकडे प्रक्रियेसाठी दिला जाणार आहे. आयोजकांनी डहाणू-बोर्डी किनारा प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्व नागरिकांनी या स्वच्छता मोहिमेत योगदान देण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

