प्रचारात महाविकास आघाडी बॅकफूटवर

प्रचारात महाविकास आघाडी बॅकफूटवर

Published on

प्रचारात महाविकास आघाडी बॅकफूटवर
बदलापूर, ता. ३० (बातमीदार) : बदलापूर नगरपालिका निवडणुकीचा प्रचार निर्णायक टप्प्यात पोहोचला असताना, महाविकास आघाडी प्रचारात पूर्णपणे बॅकफूटवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. प्रचार सुरू होऊन १० दिवस उलटले तरी शहरातील अनेक प्रभागांमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रिया गवळी यांचा चेहरा अद्याप पोहोचलेला नाही, अशी तक्रार मतदार आणि कार्यकर्त्यांकडून येत आहे.

प्रचार संपायला अवघे तीन दिवस शिल्लक असताना, शुक्रवारी (ता. २८) नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रिया गवळी यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले; मात्र या उद्घाटनालाही पक्षातील कोणताही मोठा चेहरा किंवा महाविकास आघाडीतील (ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी-शरद पवार गट) मोठा नेता उपस्थित नव्हता. आघाडीच्या एकाही मोठ्या सभेला न आल्याने उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. स्थानिक नेते प्रचारात पुढाकार घेत नसल्याचा सूर उमेदवारांच्या बैठकीतूनही व्यक्त होत आहे. यामुळे आघाडी चालवतंय तरी कोण, हा प्रश्न गंभीरपणे उपस्थित होत आहे. प्रचाराला अवघा एकच दिवस शिल्लक असताना एकही मोठी सभा न झाल्याने आघाडीची रणनीती गोंधळलेली आहे की काय, अशी चर्चा शहरभर आहे. शहरातील बलाढ्य राजकीय पक्षच स्पर्धा कमी ठेवण्यासाठी महाविकास आघाडीला थंड धोरणाकडे ढकलत असल्याची कुजबुज मतदारांत आहे.

स्पर्धेतून बाहेर होण्याची भीती
एकीकडे शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध भाजप–राष्ट्रवादी (अजित पवार गट) युती यांच्यात थेट मुकाबला रंगलेला असताना, महाविकास आघाडी मतदारांना एक तिसरा पर्याय देईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्ष मात्र प्रचार सुरू झाल्यानंतर आघाडीसोबतचे सर्वच नेते सुस्तावलेले दिसत आहेत. शहरातील महत्त्वाच्या प्रभागांमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांची उपस्थितीही कमी असल्याचा आरोप उमेदवारांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com