सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या पुर्नबांधणी काम प्रगतीपथावर
सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचे काम प्रगतिपथावर
१२ कोटींच्या प्रकल्पाला लवकरच सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३० : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे सावित्रीबाई फुले नाट्यगृह हे गेल्या काही महिन्यांपासून दुरुस्तीअभावी बंद असल्याने कलाकारांसह प्रेक्षकांचा हिरमोड होत होता. नाट्यगृहाचे बांधकाम जुने झाल्याने त्याच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव शासनापुढे पालिका प्रशासनाने ठेवला होता. अखेर या कामास गती प्राप्त झाली असून, १२ कोटींची निविदा प्रक्रिया मंजूर झाली आहे. लवकरच या कामाची सुरुवात होणार असल्याची माहिती आहे.
रविवारी (ता. ३०) भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांसह सावित्रीबाई फुले नाट्यगृहाची पाहणी केली. या वेळी त्यांनी या कामास लवकरच सुरुवात होणार असून, सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याचा मानस असल्याचे सांगितले. डोंबिवलीतील पालिकेचे सावित्रीबाई फुले नाट्यगृह हे पालिका प्रशासनासाठी पांढरा हत्ती ठरत होते. नाट्यगृहाची जर्जर अवस्था, छताचा ओलावा, आसनव्यवस्थेतील त्रुटी, ध्वनिक्षेपणाच्या समस्या अशा अनेक अडचणींवरून प्रेक्षक, कलाकार आणि स्थानिक सांस्कृतिक संस्थांकडून सतत टीका होत होती. याबाबत काही प्रमाणात डागडुजी झाली असली तरी इमारतीची मूळ रचना आणि बांधकाम जुने असल्याने समस्या कायम राहिल्या.
प्रेक्षागृहातील छताचा भाग कोसळला
मे महिन्यात एका नाटकाचा प्रयोग सुरू असतानाच प्रेक्षागृहातील छताचा एक भाग अचानक कोसळला आणि तातडीने नाट्यगृह बंद करण्यात आले. या घटनेनंतर स्ट्रक्चरल ऑडिट आणि संपूर्ण दुरुस्तीची मागणी जोर धरू लागली. २० वर्षांपूर्वी बांधलेले हे नाट्यगृह आता पूर्णपणे कालबाह्य झाले असल्याने नव्याने बांधणी हा एकमेव पर्याय असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आयुक्त अभिनव गोयल यांनी अधिकाऱ्यांना प्रकल्पाची नव्याने आखणी करण्याचे निर्देश दिले होते.
आधुनिक दर्जाच्या रंगमंदिराचा मानस
नूतनीकरणासाठी पालिकेने शासनाकडे निधीची मागणी केली होती. शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे पुनर्बांधणीकरण मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहाच्या धर्तीवर करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. नाट्यगृहाचा लूक, ध्वनीव्यवस्था, लायटिंग, स्टेज मॅनेजमेंट, आसनव्यवस्था, सुरक्षा मानकांपर्यंत संपूर्ण बदल घडवून आधुनिक दर्जाचे रंगमंदिर उभारण्याचा पालिकेचा मानस आहे. निविदा प्रक्रिया जारी होताच तीन महिन्यांत काम पूर्ण करण्याचा पालिकेचा मानस आहे.
सहा महिन्यांत नाट्यगृह पुन्हा प्रेक्षकांच्या सेवेत
रविवारी पाहणी केल्यानंतर दीपेश म्हात्रे यांनी प्रसारमाध्यमांना याविषयी माहिती देताना सांगितले, की भाजपा प्रदेश अध्यक्ष चव्हाण यांनी या नाट्यगृहाची पाहणी करीत कामाचा आढावा घेतला. नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी १२ कोटींच्या कामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, एक आठवड्यात कामाला सुरुवात केली जाणार आहे. या प्रकल्पात साडेसात कोटी रुपये इलेक्ट्रिक आणि तांत्रिक कामांवर खर्च होणार असून, पाच कोटी रुपये सिव्हिल वर्कसाठी आहेत. डोंबिवलीकरांच्या जिव्हाळ्याचा हा ठेवा असल्याने काम वेगाने पूर्ण करून पुढील सहा महिन्यांत नाट्यगृह पुन्हा प्रेक्षकांच्या सेवेत उपलब्ध होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
१९९५मध्ये पायाभरणी झालेल्या या नाट्यगृहाला पूर्ण होण्यासाठी ११ वर्षे लागली होती. शहरातील नाट्यप्रेमींच्या सांस्कृतिक ओळखीचा तो एक महत्त्वाचा भाग बनला. मात्र गेल्या पाच महिन्यांपासून ते बंद असल्याने कलाकार आणि प्रेक्षक निराश होते. आता निविदा प्रक्रिया आणि पुनर्बांधणी प्रक्रिया लवकर सुरू झाल्यास डोंबिवलीकरांना लवकरच आधुनिक, सुरक्षित आणि आकर्षक कालिदासच्या धर्तीवरचे नवे रंगमंदिर पाहायला मिळणार आहे. शहराच्या सांस्कृतिक जगताला नवी ऊर्जा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

