लग्नसोहळ्यांमुळे महामारीला आमंत्रण

लग्नसोहळ्यांमुळे महामारीला आमंत्रण

Published on

लग्नसोहळ्यांमुळे महामारीला आमंत्रण
उष्टे, शिळे अन्न, कचऱ्यामुळे येऊरमधील वन्यजीव संकटात; प्राणिमित्रांचे वन अधिकाऱ्याना पत्र
ठाणे शहर, ता. ३० (बातमीदार) : निसर्गरम्य येऊरच्या जंगलात थाटात होणारे लग्नसोहळे, पार्ट्या महामारीला आमंत्रण देत असल्याच्या गंभीर मुद्द्याकडे प्राणिमित्रांनी लक्ष वेधले आहे. लग्नसोहळ्यानंतर जंगलात सर्रास फेकून देण्यात येत असलेल्या उष्‍टे, शिळे अन्न, कचरा येथील माकडे, उंदीर खात असून. त्यांच्या विष्ठेने नैसर्गिक स्रोत दूषित होत आहेत. त्यातून प्लेग, लेप्टोस्पायरोसिस, कर्करोगासारखे आजार वन्यजीवांना होण्याचा धोका वाढला असून, वन्यजीवांची साखळी संकटात सापडली आहे. तसेच हा धोका मानवापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची कडक अंमलबजावणी करीत येऊरमधील लग्नसोहळे तत्काळ थांबवण्यात यावे, अशी मागणी पालिका आयुक्त आणि वन अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर हा भाग ठाणे महापालिकाच्या हद्दीत येतो. या भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बंगले, फार्महाउस, लग्नाचे फार्म, ढाबे, रेस्टॉरंट्स आणि टर्फ क्लब उभे राहिले आहेत. या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत कर्कश आवाजाचे वाद्य वाजवून जंगलामधील जैविक साखळी नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आदिवासी संस्कृतीला बाधा पोहोचवली जात आहे. येथील अनधिकृत बांधकामे आणि अनधिकृत कृत्यांना पोलिस, पालिका आणि वन विभागाने आळा घालावा, यासाठी पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीचे अध्यक्ष रोहित जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निदर्शनास हे प्रकार आणून दिले आहेत. त्याची न्यायालयाने गंभीर्याने दखल घेऊन येथील अतिक्रमणे पाडण्याचे आदेश ठाणे महापालिकेला दिल्यानंतर पालिकेने थातूरमातूर कारवाई करीत काही बंगल्यांचे अतिक्रमण पाडले आहे. मात्र आता येथे दिवसरात्र लग्न आणि पार्ट्या सुरू असल्याचे दिसून येत आहे.

लग्न आणि पार्ट्यांचे उरलेले अन्न, इतर खाद्यपदार्थ इकडे तिकडे फेकून दिले जात आहेत. शिळे झालेल्या अवस्थेत ते जंगलातील पशुपक्ष्यांच्या पोटात जाऊन त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याची भीती रोहित जोशी यांनी व्यक्त केली आहे. जंगलात प्लॅस्टिक आणि इतर घातक कचऱ्याचे प्रमाण वाढले असून, पर्यावरणाला नुकसान पोहोचत आहे. येथील जीवसृष्टीलाच धोका निर्माण झाला आहे.

कचरा आणि शिळे अन्न खाणारी माकडे, उंदीर, कुत्रे, मांजर यांसारखे प्राणी बिबट्यासारख्या शिकारी प्राण्यांच्या खाण्यात येत असल्याने प्लेग, रेबीज, लेप्टोस्पायरोसिस यांसारख्या रोगांचे संक्रमण जंगलातील इतर पशुपक्ष्यांना होण्याचा धोका वाढला आहे. प्राणी, पर्यावरणाचा ऱ्हास थांबाविण्यासाठी पोलिस, वन विभाग आणि ठाणे महापालिकेने लग्न आणि रात्रीच्या पार्ट्यांसाठी जागा देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे रोहित जोशी यांचे म्हणणे आहे.

ठळक समस्या
नैसर्गिक ओढे, नाले, तलाव आणि पानथळी ठिकाणी प्लॅस्टिकसारखा कचरा आढळून येत आहे.

मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे निशाचर असलेल्या बिबट्यांचा मुक्त संचार थांबला आहे. प्रदूषणातही वाढ झाली आहे.

जंगलामधील शांतता भंग पावत असून, भीतीपोटी बिबटे, माकडे असे प्राणी इतरात्र स्थलांतर करण्याचा धोका वाढला आहे.

झुनोटिक रोगांचे संकट
येऊरमधील जेवणावळीमुळे उच्च जोखीम असलेल्या झुनोटिक रोगाचे मोठे संकट उभे ठाकले आहे.

रोग स्रोत प्राणी प्रसार मार्ग मानवी परिणाम
रेबिज भटकी कुत्री, माकडे चावा, ओरखडा मृत्यू (उपचार न झाल्यास)
लेप्टोस्पायरोसिस उंदीर, कुत्रे दूषित पाणी मूत्रपिंड निकामी
प्लेग उंदीर फ्ली बाइट्स अतिघातक
हंटाव्हायरस उंदीर हवेतील कण श्वसनसंस्थेचे निकामीपण
डेंग्यू डास चावा रक्तस्रोवजन्य ताप मज्जासंस्थेचा विकार
अवियन इन्फ्लुएंझा पक्षी श्वसनातून महामारीची शक्यता

रोगाच्या प्रसाराची साखळी कशी तयार होते?
विवाहसोहळ्यांचा कचरा, अन्न - अन्नावर अवलंबून माकडे, कुत्रे, उंदीर - हे प्राणी मानवांशी संपर्कात आल्यावर रोगांचे जलद संक्रमण.

कायदेशीर कारवाई करा
सर्व वेडिंग फार्म्स, क्लब, ढाबे, लॉन्स यांच्यावर तत्काळ कारवाई करीत अनधिकृत बांधकाम पाडून टाकण्याची मागणी जोशी यांनी महापालिकेकडे केली आहे. तसेच वन विभाग, पोलिस, पर्यावरण, आरोग्य विभाग यांची संयुक्त कमिटी स्थापन करून सतत निरीक्षणासाठी रिअल-टाइम मॉनिटरिंग सिस्टीम आणि वन्यजीवांच्या आरोग्याचा सर्व्हे करावा, अशी मागणी रोहित जोशी यांनी केली आहे. सूचना येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीचे अध्यक्ष रोहित जोशी यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com