तळोजा औद्योगिक वसाहतीमधून २५ टन कचऱ्याचे संकलन
तळोजा औद्योगिक वसाहतीमधून २५ टन कचऱ्याचे संकलन
महापालिकेची घनकचरा व्यवस्थापन व्यवस्था भक्कम
सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. ३० : ‘स्वच्छ पनवेल सुंदर पनवेल’ या उद्देशाने आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी महापालिका क्षेत्रातील चारही प्रभाग व औद्योगिक वसाहतींमधील घनकचरा व्यवस्थापनावरती विशेष लक्ष दिले आहे. यामध्ये तळोजा औद्योगिक वसाहतीमधील घनकचरा संकलन, वाहतूक व व्यवस्थापनाची जबाबदारी महापालिकेमार्फत काटेकोरपणे पार पाडली जात असून, या कार्यासाठी महापालिकेने नियुक्त केलेल्या मे. ए. जी. इनविरो इन्फ्रा प्रोजेक्ट लि. या कंत्राटदारामार्फत नियमित सेवा पुरविली जात आहे.
महापालिका क्षेत्रात दररोज निर्माण होणाऱ्या सरासरी ५०० टन कचऱ्यापैकी सुमारे २० ते २५ टन कचरा तळोजा औद्योगिक वसाहत परिसरातून जमा केला जातो. महिन्याला जवळपास ७०० टन कचऱ्याचे संकलन व वाहतूक केली जाते. संकलित कचऱ्याची प्रक्रिया सिडकोच्या घनकचरा प्रक्रिया केंद्रात केली जात असून, या प्रक्रियेसाठीचा खर्च महापालिकेमार्फत सिडको प्राधिकरणास अदा केला जातो. महापालिकेच्या आकडेवारीनुसार पालिका क्षेत्रात निर्माण होणाऱ्या एकूण कचऱ्यापैकी पाच टक्के कचरा तळोजा एमआयडीसीमधून निर्माण होत असून, या कचऱ्याच्या संकलन व प्रक्रिया व्यवस्थापनासाठी पालिकेला वार्षिक सुमारे २.६८ कोटी इतका खर्च होत आहे. तथापि, तळोजा औद्योगिक क्षेत्रातून मिळणारे घनकचरा उपयोगकर्ता शुल्क अत्यल्प असून, या माध्यमातून केवळ २९ लाख ७५ हजार इतका महसूल प्राप्त होतो.
................
कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई होणार
तळोजा औद्योगिक वसाहत क्षेत्रात एकूण ९५० औद्योगिक भूखंडांपैकी ३५८ कंपन्यांमधून नियमित घनकचरा निर्माण होतो. या कंपन्यांकडून रोज कचरा उचलण्यासाठी एक एलआरसी आणि दोन एमआरसी वाहनांसह १२ जणांचे मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. या वाहनांवर जीपीएस प्रणाली बसविण्यात आली असून, त्यामुळे कामावर सतत देखरेख ठेवली जाईल. कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र व्हाॅट्सॲप नियंत्रण गट तयार करण्यात आला आहे. संबंधित औद्योगिक संस्थांकडून मिळालेल्या तक्रारींवर त्वरित कार्यवाही करण्यात येत असून, वेळेत काम न झाल्यास कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई लागू केली जात असल्याची माहिती उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

