उरणमध्ये राजकीय तापमान चढले
उरणमध्ये राजकीय तापमान चढले
खासदार श्रीरंग बारणे यांचा भाजप विरोधी सुर; आमदार बालदींवर थेट टिकास्त्र
उरण, ता. ३० (वार्ताहर) : उरण शहरातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा ढवळून निघाली असून, शिवसेना (शिंदे गट) व भाजपमधील तणाव उघडपणे समोर आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी उरणमध्ये थेट भाजप आणि आमदार महेश बालदी यांच्यावर टीकास्त्र सोडत आगामी निवडणुकांमध्ये ‘जागा दाखवण्याचा’ इशारा दिला आहे. उरण शहर कोणाचीही जहागिरी नाही. शिवसेना कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसेल तर त्यांना बळ देणे हे माझे कर्तव्य आहे. कोणी कितीही विरोध केला तरी शिवसेनेचा विस्तार रोखू शकत नाही, अशा ठाम शब्दांत त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
उरण नगर परिषद निवडणुकीत भाजपने आपल्या मित्रपक्ष शिवसेनेला (शिंदे गट) युतीतून दूर सारताच शिवसेनेने नगराध्यक्ष आणि चार नगरसेवक पदांवर उमेदवार उभे करून थेट विरोधात रणसंग्राम उभारला आहे. टक्केवारीचे राजकारण कोण करते हे उरणची जनता जाणते, असा घणाघात करीत बारणे यांनी भाजपच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. बारणे म्हणाले की भाजपने केवळ मोठ्या मनाने दोन जागा दिल्या असत्या, तरी आम्हाला युतीबाहेर पडण्याची वेळ आली नसती. त्यांच्या या विधानातून दोन्ही पक्षांतील असंतोष किती खोलवर आहे, हे स्पष्ट झाले. शिंदेंविरुद्ध जो बोलेल त्याला त्याची जागा दाखवू, अशा शब्दांत खासदार बारणे यांनी उरणचे आमदार महेश बालदी यांना थेट इशारा दिला. बालदी यांनीही मागे न हटता, खासदार बारणे यांनी आमच्यावर केलेल्या उपकाराची ही परतफेड असेल तर पुढील लोकसभा निवडणुकीत त्यांना उरण तालुक्यातील भाजप मदत करणार नाही, असा जाहीर रोष व्यक्त केला आहे.
..................
भाजप कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाची खदखद
गेल्या लोकसभा निवडणुकीत बारणे यांच्या विजयासाठी उरण व पनवेल विधानसभा क्षेत्रातील भाजप कार्यकर्त्यांनी जीव ओतून प्रचार केला होता. त्या मदतीच्या जोरावरच बारणे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले, अशी कार्यकर्त्यांची सार्वत्रिक भावना आहे. मात्र आता उरण नगर परिषद निवडणुकीत बारणे यांनी शिंदे सेनेला जो उघड पाठिंबा दिला तो थेट आमदार बालदी यांच्या प्रतिष्ठेला धक्का देणारा ठरल्याचे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
.............
मित्रपक्षांतील ताण वाढत चालला
भाजपच्या म्हणण्यानुसार मित्रपक्ष असूनही शिवसेनेचे हे पाऊल म्हणजे उन्माद असून, भविष्यात याचे दुष्परिणाम बारणे यांनाच भोगावे लागतील. शिवसेनेच्या बंडखोरीला बारणे यांचीच साथ असल्याचा आरोप करीत भाजपने नाराजीचा सूर अधिक तीव्र केला आहे. उरणच्या राजकारणात भाजप–शिवसेना संबंध आता निर्णायक वळणावर येत असून, पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी या संघर्षामुळे दोन्ही पक्षांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

