निकृष्ट दर्जायची रस्ते दुरुस्तीची कामे महापालिकेच्या नोटिसीला ठेकेदारांचा प्रतिसादच नाही
निकृष्ट रस्त्यांच्या कामांमागे राजकीय वाद
महापालिकेच्या नोटिसांकडे १३ ठेकेदारांचे दुर्लक्ष
विरार, ता. १ (बातमीदार) : वसई-विरार महापालिका क्षेत्रातील रस्तेदुरुस्तीच्या कामांमध्ये निकृष्ट दर्जा आणि विलंब केल्याचा ठपका ठेवत पालिकेने पॅनेलवरील १३ कंत्राटदारांना नोटीस बजावली होती. दरम्यान, दीड महिन्याहून अधिक काळ उलटूनही या ठेकेदारांनी अद्याप पालिकेच्या नोटिसीला कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे खुद्द नोटीस बजावणारे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांनीही यावर ठोस माहिती दिलेली नाही. यामुळे महापालिकेच्या कार्यप्रणालीवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वसई-विरार शहरांतील रस्तेदुरुस्तीचा त्रैवार्षिक ठेका १३ ठेकेदारांना देण्यात आलेला आहे. यावर्षी त्यांनी रस्त्यांची दुरुस्ती वेळेत केलेली नाही तसेच काही ठिकाणी केलेली कामेही अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत, असा ठपका महापालिकेने ठेवला होता. त्यांना या निकृष्ट कामांबद्दल खुलासा सादर करण्यास सांगण्यात आले होते. परंतु आजपर्यंत एकाही ठेकेदाराने पालिकेकडे खुलासा सादर केलेला नाही. महत्त्वाचे म्हणजे महापालिकेनेही त्यांच्याविरोधात कोणतीही पुढील कार्यवाही केलेली नाही. या गंभीर विषयावर ठेकेदारांकडून खुलासा न आल्याने आणि पालिकेकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न आणि या कामांमागील राजकीय हेतू अधिक गडद झाला आहे.
या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण मिळाल्याची चर्चा वसई-विरारच्या राजकीय वर्तुळात आहे. माजी आमदार क्षितिज ठाकूर यांच्या नेतृत्वात बहुजन विकास आघाडीने (बविआ) ५ ऑक्टोबरला रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढत वसईतील सात रस्त्यांसाठी पॅचवर्क, डांबरीकरण आणि नंतर एमएमआरडीएच्या माध्यमातून पुन्हा काँक्रीटीकरण अशा कामांवर अंदाजित ६७ कोटी रुपये खर्च होणार असल्याचा उल्लेख करीत हा एक घोटाळा असल्याचा आरोप केला होता. यावर भाजपने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बविआशी संबंधित असलेल्या पॅनेलवरील १३ ठेकेदारांना निकृष्ट कामे आणि विलंबाच्या कारणावरून नोटिसा बजावण्यास लावली, असा कयास राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केला आहे.
आर्थिक कोंडीची चर्चा
या नोटीस प्रकरणातून सत्ताधारी भाजपने अप्रत्यक्षपणे बविआची आर्थिक कोंडी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. वसई-विरार महापालिकेत यापूर्वी बविआची सत्ता होती आणि साहजिकच येथील बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदारांवर त्यांचा प्रभाव होता. २०२४च्या विधानसभा निवडणुकीत बविआच्या झालेल्या दारुण पराभवानंतर मागील पाच वर्षांपासून पालिकेत प्रशासकीय राजवट असली तरी त्यावर भाजपचे नियंत्रण आहे. या पार्श्वभूमीवर भाजप मिळेल त्या मार्गाने बविआची आर्थिक तसेच राजकीय कोंडी करीत असल्याचा सूर राजकीय गोटात उमटत आहे.
================================
नोटीस बजावण्यात आलेले ठेकेदार
नोटीस बजावण्यात आलेल्या ठेकेदारांत मे. चंदना कन्ट्रक्शन भाईंदर पूर्व, मे. राठोड भाग्यजीत अँड कंपनी वसई पश्चिम, मे. जैन कंट्रक्शन कंपनी बोरिवली पूर्व, मे. आर. अँड बी. इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड बोरिवली पश्चिम, मे. नेवाळकर एंटरप्राईजेस विरार पश्चिम, श्री. जी. ई. पी. सी. प्रा. लिमिटेड, मे. गजानन कंट्रक्शन, मे. एन. ए. कंट्रक्शन प्राइव्हेट लिमिटेड भाईंदर पश्चिम, मे. दक्ष एंटरप्रईजेस वसई, मे. सद्गुरू कन्स्ट्रक्शन वसई, मे. जय भवानी इन्फ्रा प्रोजेक्ट भाईंदर पूर्व, जिजाऊ कंट्रक्शन रोड बिल्डर प्रा. लि. ठाणे पश्चिम आणि मे. साई गणेश एंटरप्राईजेस पारोळ वसई यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

