शहाड स्थानक ते मुरबाड बस सोडा
मुरबाड, ता. १ (बातमीदार) : मुरबाड तालुका आणि आसपासच्या परिसरातील प्रवाशांकडून उल्हासनगर महापालिकेतर्फे शहाड रेल्वेस्थानक ते मुरबाड अशी बस सेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सध्या मुरबाड-कल्याण मार्गावर एसटी बसची कमतरता असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
मुरबाड व कल्याण आगारातून दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. नोकरी-धंद्यासाठी शेकडो प्रवासी या मार्गावर वर्दळ करत असतानाही पुरेशा एसटी बस गाड्या उपलब्ध नाहीत, अशी प्रवाशांची तक्रार आहे. परिणामी, वेळेवर कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी प्रवाशांना नाईलाजाने काळ्या-पिवळ्या इको गाड्या, खासगी कार किंवा इतर महागडे पर्याय वापरावे लागत आहेत. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाचे दररोज हजारो रुपयांचे नुकसान होत असल्याचे तालुका प्रवासी संघटनेचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर मुरबाडे यांनी सांगितले.
सध्या उल्हासनगर महापालिकेतर्फे शहाड-टिटवाळा मार्गावर बससेवा सुरू आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांना त्याचा मोठा लाभ झाला आहे. याच धर्तीवर शहाड ते मुरबाड अशी बस सुरू केल्यास कल्याण तालुक्यातील मामनोलीपर्यंतचा प्रवास सोयीचा होईल. बस पुढे मुरबाडपर्यंत नेल्यास संपूर्ण मुरबाड तालुक्याला मोठा दिलासा मिळेल. प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल. दुसरीकडे एसटीवरील ताण कमी होईल.
प्रवाशांची संयुक्त मागणी
उल्हासनगर महापालिकेच्या विद्यमान बससेवेचा चांगला प्रतिसाद पाहता, शहाड-मुरबाड बससेवा तत्काळ सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून सातत्याने होत आहे. स्थानिक प्रवाशांनी महापालिका प्रशासन, परिवहन विभाग आणि जनप्रतिनिधींनी या मागणीची गंभीर दखल घेऊन नवीन बससेवा लवकर सुरू करावी, असे आवाहन केले आहे.
शहाड रेल्वेस्थानक ते मुरबाड या मार्गावर राज्य परिवहन महामंडळातर्फे नवीन बस सुरू केल्यास प्रवाशांना जलद गतीने शहाडला पोहचता येईल. तेथून लोकलद्वारे कल्याण, ठाणे, मुंबई किंवा आसनगाव, कसाऱ्याकडे जाणे शक्य होईल. यात वेळेत व प्रवास भाड्यात बचत होणार आहे. त्यामुळे या मार्गावर बस सेवा सुरू करण्याची प्रवाशांची मागणी आहे.
- ज्ञानेश्वर मुरबाडे, माजी अध्यक्ष
मुरबाड तालुका प्रवासी संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

