एका रात्रीत सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ
अंबरनाथ, ता. १ (वार्ताहर) : अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एका रात्रीत सोनसाखळी चोरी केल्या आहेत. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिस गस्त तातडीने वाढवण्याची मागणी होत आहे.
अंबरनाथमध्ये राहणारे मोहित अमृते हे पत्नीसमवेत रात्रीच्या वेळी शतपावली करत असताना मागून आलेल्या दुचाकीवरील दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील एक लाख १० हजार रुपये किमतीची सोनसाखळी खेचून पलायन केले. केवळ काही मिनिटांतच बी-कॅबिन रोड, परशुराम रेसिडेन्सी येथे आकाश अडसूळ यांच्या गळ्यातील सोनसाखळी त्याच वर्णनाच्या आरोपींनी हिसकावली. दोन्ही आरोपींचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असून पुढे बसलेला व्यक्ती पिवळ्या जॅकेटमध्ये तर मागे बसलेला काळ्या जॅकेटमध्ये होता.
अंबरनाथ पूर्व येथील पालेगाव रोडवरील डी-मार्टजवळील जलसा लॉन्ससमोर रुक्मिणी शेळके या स्कूटीवरून लग्नसमारंभासाठी जात असताना त्यांच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीची बोरमाळ चोरट्यांनी हिसकावली आणि बदलापूरच्या दिशेने पळ काढला. या तिन्ही घटनांबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
अंबरनाथ-बदलापूर परिसरात एका दिवसात सलग घडलेल्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. विशेषतः महिलांना लक्ष्य करणाऱ्या घटनांमुळे भीतीचे वातावरण अधिक गडद झाले आहे. पोलिसांनी संबंधित घटनांमध्ये गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
बदलापूरमध्येही दोन घटना
बदलापूरमध्येही चोरट्यांचा हल्ला सुरूच राहिला. आशुतोष गवळी व त्यांची पत्नी गांधी चौकातील किराणा दुकानातून बाहेर पडत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी गवळी यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या दिशेने पलायन केले. त्यानंतर त्याच दोन आरोपींनी मासळी बाजार परिसरात कुणाल गायकवाड यांच्या गळ्यातील अर्धी सोनसाखळी हिसकावून फरार झाले. या घटनांबाबत बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

