

पालघर, ता. १ (बातमीदार) : जिल्ह्यात नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असली तरी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या इच्छुकांनी आपल्या स्वतंत्र प्रचार मोहिमेला वेग दिला आहे. निवडणुका जाहीर झाल्या नसल्या तरी गावोगावी राजकीय हालचाली वाढल्या आहेत. स्थानिक पातळीवर विविध गट-तट सक्रिय झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
पालघर जिल्ह्यातील तीन नगर परिषद आणि एक नगर पंचायतींसाठी निवडणूक होत आहे. या नगर परिषदांच्या निवडणुकीचा गाजावाजा मोठा असला, उमेदवारीवरून झालेल्या चढाओढीमुळे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे, तर ग्रामीण भागातील इच्छुक मात्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या दृष्टीने आपली पकड मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहेत. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात इच्छुकांकडून भेटीगाठी, स्नेहसंमेलने वाढले आहेत. इच्छुकांनी मंडळे, वाड्या-वस्त्या, स्थानिक उत्सव, लग्नकार्य, कार्यक्रमांना हजेरी लावण्याचा धडाका लावला आहे. काही ठिकाणी पाणी, रस्ते, शाळा, आरोग्य केंद्रांची पाहणी करत समस्यांची यादी तयार करणाऱ्या बैठका घेत आहेत. अशा उपक्रमांमागील त्यांचा उद्देश स्पष्ट दिसतो.
इच्छुकांनी घेतला शिबिरांचा आधार
निवडणूक जाहीर न झाल्याने मोठे मेळावे आयोजित करण्यावर मर्यादा आहेत. अनेक इच्छुकांनी ‘शिबिरां’चा पर्याय निवडला आहे. आरोग्य शिबिरे, महिला सक्षमीकरण कार्यशाळा, शेतकरी मार्गदर्शन, विद्यार्थी करिअर काउंसिलिंग, क्रीडा स्पर्धा व महिलांसाठी देवदर्शन असे उपक्रम राबवून आपली उपस्थिती दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये बहुतांश उपक्रम सामाजिक बांधिलकीच्या नावाखाली घेतले जात असले तरी त्यातून ग्रामीण भागात इच्छुकांची ओळख आणि संपर्क मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. इच्छुकांनी अनेक पर्याय शोधले आहेत. योजनांची माहिती देणे, लाभार्थ्यांना मार्गदर्शन करणे, गावस्तरावर सूचना ऐकून घेणे, लोकप्रतिनिधी म्हणून काय करता येईल, याबाबत चर्चा करणे असे उपक्रम घेतले जात आहेत. काही ठिकाणी महिला बचत गट, शेतकरी संघटना, युवक मंडळांच्या बैठकीत सहभागी होऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
निवडणूक जाहीर होण्याची प्रतीक्षा
सरकारकडून डिसेंबरमध्ये निवडणूक जाहीर करण्यासंबंधी स्पष्ट संकेत आहेत. नगर परिषदांच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकी होणार असल्याने गावपातळीवर इच्छुकांच्या हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे आता केवळ निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर होण्याची प्रतीक्षा ग्रामीण भागात नागरिकांसह इच्छुकांना आहे.
पक्षांकडून इच्छुकांच्या मुलाखती
काही पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. त्याबाबत पक्ष कार्यालयात मेळाव्यांचेदेखील आयोजन केले जात आहे, तर आता निवडणूक जवळ आल्याने इच्छुकांकडून पक्ष कार्यालयात अर्ज मागवून घेण्याचीही प्रक्रिया पक्षांनी सुरू केली आहे. नगर परिषद व पंचायत निवडणुका जवळ जवळ सर्वच पक्षाने स्वतंत्र मिळविण्यात आले आहेत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक काही स्वतंत्र लढण्याचा पवित्रा सर्वच पक्षांनी घेतलेला दिसून येत आहे सर्वप्रथम इच्छुकांची गर्दी वाढल्याने जागावाटपामध्ये वादविवाद होत आहेत. त्यामुळे स्वतंत्र लढण्याचे ठरविण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.