(मुंबई टुडे)आयआयटी मुंबईत भारतीय ज्ञान प्रणाली आणि बौद्धिक संपदेवर कार्यशाळा संपन्न

(मुंबई टुडे)आयआयटी मुंबईत भारतीय ज्ञान प्रणाली आणि बौद्धिक संपदेवर कार्यशाळा संपन्न

Published on

विकसित भारतासाठी आयपीआर महत्त्वाचे
आयआयटी मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न
मुंबई, ता. १ : भारताचे समृद्ध पारंपरिक ज्ञान आणि वारसा यामध्ये विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्याची प्रचंड क्षमता असल्याचे अधोरेखित करत आयपीआर यंत्रणा बळकट केल्यास लाभाची योग्य वाटणी सुनिश्चित होईल, ज्ञानाचा गैरवापर टळेल आणि नवकल्पनांना चालना मिळेल, असे प्रतिपादन आयआयटी मुंबईचे संचालक प्रो. शिरीष केदारे यांनी केले.
''विकसित भारत आणि भारतीय ज्ञान प्रणालीच्या संवर्धनात बौद्धिक संपदा अधिकारांची (आयपीआर) भूमिका'' या विषयावर आयआयटी मुंबईत तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद नुकतीच संपन्न झाली. राष्ट्राच्या विकासासाठी स्थानिक ज्ञानाचे संरक्षण आणि उपयोग करण्यात आयपीआरची भूमिका काय असावी, यावर या परिषदेत सखोल विचारमंथन झाले.
वैज्ञानिक प्रगती आणि स्थानिक ज्ञान यांचा सर्वांगीण संगम, तसेच आधुनिक उद्यमशीलता आणि पारंपरिक ज्ञान यांच्यातील दुवा म्हणून आयपीआर यंत्रणेचा वापर, हे ''विकसित भारत २०४७'' च्या प्रवासातील एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल असल्याचेही मत केदारे यांनी व्यक्त केले.
या परिषदेत केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे महासंचालक डॉ. ए.पी.जे. सिंग, पद्मश्री गिरीश प्रभुणे, आयआयएमचे संचालक प्रा. प्रफुल्ल अग्निहोत्री, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, केंद्र सरकारचे पेटंट सहनियंत्रक डॉ. दिनेश पाटील आणि ॲड. गणेश हिंगमिरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. उद्योग, शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच स्थानिक समुदायाचे प्रतिनिधी परिषदेत सहभागी झाले होते.

चर्चा आणि शोधनिबंध
परिषदेत देशाच्या विविध भागांतील लोकपरंपरा, लोककला आणि ज्ञानपरंपरा यावर चर्चा झाली. भौगोलिक निर्देशांक आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी भारतीय ज्ञान प्रणालीचा (आयकेएस) नवोपक्रम परिसंस्थेत समावेश करण्याच्या धोरणांवर समूह चर्चासत्रे आकर्षणाचे केंद्र ठरली. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय प्रतिनिधींनी आयकेएस, आयपीआर फ्रेमवर्क, तंत्रज्ञान, समुदाय सक्षमीकरण आणि धोरणात्मक पाठिंबा या विषयांवर ७५ हून अधिक शोधनिबंध सादर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com