बदलापुरात ‘काटे की टक्कर’
बदलापुरात ‘काटे की टक्कर’
बदलापूरकरांचे लक्ष महत्त्वाच्या प्रभागांकडे!
बदलापूर, ता. १ (बातमीदार) : कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे मतदान आज मंगळवारी (ता. २) होत असून, शहरातील दोन लाख ३५ हजार ३५५ मतदारांचा कौल कोणाच्या दिशेने जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ४९ पैकी सहा जागांवरील निवडणुका न्यायालयीन प्रक्रियेने स्थगित असल्याने उर्वरित ४३ जागांवर उद्या मतदान पार पडणार आहे. या ४३ जागांमध्ये अनेक प्रभाग हे अत्यंत चुरशीचे आणि थेट लढतीचे असून, बहुतेक ठिकाणी दोन्ही बाजूंची ताकद तितकीच तोलामोलाची दिसत असल्यामुळे कोण बाजी मारणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
प्रभाग १-ब मधील तुकाराम म्हात्रे (शिंदे गट) आणि प्रभाकर पाटील (राष्ट्रवादी अजित पवार गट) यांच्यातील जुनी प्रतिस्पर्धा पुन्हा एकदा रंगली असून, अलीकडील पैसेवाटप प्रकरणातील हाणामारीमुळे हा प्रभाग आणखी संवेदनशील ठरला आहे. प्रभाग ३-अ मध्ये सलग तीन वेळा नगरसेविका असलेल्या भाजपाच्या रुचिता घोरपडे आणि शिंदे गटाच्या नवख्या सपना मुसळे यांच्यात लढत रंगली आहे; तर ३-ब मध्ये भाजपाचे शरद तेली आणि शिंदे गटाचे वरुण म्हात्रे यांच्यात थेट टक्कर आहे. या प्रभागात वरुण म्हात्रे यांच्या समर्थनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेनंतर लढतीला आणखी धार आली आहे.
प्रभाग ४-अ आणि ४-ब मध्ये शिंदे गटाचे गटनेते श्रीधर पाटील आणि माजी नगरसेविका स्वप्ना पाटील हे अनुक्रमे राष्ट्रवादीच्या भारती लिये आणि भाजपच्या कविता तेली यांच्याविरोधात उभे आहेत. दोन्ही ठिकाणी तिरंगी स्वरूपाचे वातावरण असून, प्रभाग ६-अ व ६-ब मधील लढतीदेखील शहरभर चर्चेत आहेत. प्रियांका दामले (राष्ट्रवादी) विरुद्ध पूजा टांकसाळकर (शिंदे गट) ही एक तुफानी लढत, तर ६-ब मध्ये किरण भोईर (भाजप) विरुद्ध राजेंद्र चव्हाण (शिंदे गट) ही पूर्वीच्या निकालांची पार्श्वभूमी असलेला सामना रंगणार आहे. प्रभाग १४-ब मध्ये उमेदवारी न मिळाल्याने भाजप सोडून शिंदे गटात गेलेल्या संजय भोईर यांनी माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांना रोखण्याचे आव्हान दिले असून, हा प्रभागही हाय-प्रोफाइल ठरतो.
पाच जागांचे मतदान स्थगित
शहरातील एकूण सत्ता कोणाच्या दिशेने जाईल, याचा अंतिम अंदाज सध्या लावणे कठीण आहे. कारण प्रभाग ५-ब, ८-अ, १०-ब, १५-ब आणि १७-अ या पाच स्थगित जागांचे मतदान २० डिसेंबरला तर निकाल २१ डिसेंबरला जाहीर होणार आहे. प्रभाग १९-अ मात्र बिनविरोध निवडून आल्याने शिंदे गटाच्या शीतल राऊत यांची निवड झाली आहे. उद्याच्या मतदानात ४३ प्रभागांत व्याप्त असलेल्या ‘काटे की टक्कर’चे चित्र स्पष्ट होईल; मात्र अंतिम सत्ता कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्व बदलापूरकरांत ताणली गेली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

