सिडकोच्या घरांसाठी शिंदेंना वेळ मिळे ना ग्राहक हवालदिल, डोक्यावर दरवाढीची भीती
सिडकोच्या घरांसाठी शिंदेंना वेळ मिळेना
ग्राहक हवालदिल, डोक्यावर दरवाढीची भीती
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १ : सिडकोने गेल्यावर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर काढलेल्या महागड्या गृहप्रकल्पातील सोडतीमधील भाग्यवान विजेत्यांना अद्याप घरांच्या किमतींबाबत स्पष्टता मिळालेली नाही. सरकार दरबारी अनेक महिने पाठपुरावा केल्यानंतर पदरी निराशा आली आहे. सिडकोने याबाबत प्रस्ताव तयार करून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरबारी पाठवला आहे; परंतु पाच वेळा प्रयत्न करून मंत्र्यांना वेळ मिळत नसल्याने हा निर्णय रखडला आहे.
ऑक्टोबर २०२४ला सिडकोने ‘माझ्या पसंतीचे सिडकोचे घर’ या शीर्षकाखाली २६ हजार घरे विक्रीस उपलब्ध केली. ३२२ चौरस फूट, ३९८ चौरस फूट आणि ५४० चौरस फूट अशा तीन वेगवेगळ्या प्रकारच्या आकारांची घरे विक्रीकरिता होती. ३२२ चौरस फूट आकाराची घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता ठेवण्यात आली आहेत. तर याच आकाराची घरे अत्यल्प उत्पन्न गटाकरितादेखील ठेवण्यात आली आहेत. सहा लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असल्यामुळे या उत्पन्न गटातील लोकांना सिडकोने एलआयजीअंतर्गत टूबीएचके प्रकारातील घरे खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध केला; मात्र या घरांच्या किमतीचा आकडा थेट ७५ लाखांपासून एक कोटींपर्यंत गेला. अवघ्या सहा लाखांपर्यंत उत्पन्न असणारे लोक एक कोटींचे घर कसे घेऊ शकणार आहेत, याचा ताळमेळ तत्कालीन अधिकाऱ्यांनी बसवला आहे. त्यामुळे सिडकोची या २६ हजार योजनेतील सुमारे सात हजार घरे आजही शिल्लक आहेत. खासगी विकसकापेक्षा महाग असलेल्या या घरांबाबत सिडकोवर अनेक राजकीय पक्ष आणि ग्राहकांनी मोर्चे काढले आहे; परंतु अद्याप त्यावर निर्णय होत नसल्याने ग्राहक हवालदिल झाले आहेत.
---------------------------------
अधिवेशानात आश्वासन देऊन बैठका रद्द
आमदार शशिकांत शिंदे आणि विक्रांत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात महागड्या घरांचा प्रश्न लावून धरला होता. त्या वेळेस या घरांबाबत योग्य तो निर्णय घेऊन किंमत कमी करण्याचे आश्वासन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. शिंदेंच्या आदेशानंतर सिडकोने घरांच्या किमती कमी करून तसा अहवाल नगरविकास विभागाकडे पाठवलादेखील आहे. त्या अहवालावर संबंधित घटकांना बैठकांसाठी बोलावण्यात आले होते; मात्र शिंदे उपस्थित नसल्यामुळे आतापर्यंत पाच बैठका रद्द झाल्या आहेत.
---------------------------------------
आतापर्यंत रद्द झालेल्या बैठका
- २३ एप्रिल २०२५
- २८ एप्रिल २०२५
- २२ मे २०२५
- ६ ऑक्टोबर २०२५
- २५ नोव्हेंबर २०२५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

