उल्हासनगरात बांधकाम व्यावसायिकाची २५ कोटींची फसवणूक
उल्हासनगर, ता. १ (बातमीदार) : उल्हासनगरातील बांधकाम व्यावसायिक सुनील शामलाल तलरेजा यांना विविध बांधकाम साहित्य पुरवण्याचे प्रलोभन दाखवून तब्बल २५ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी दिल्लीतील तिघा जैन बंधूंविरोधात मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कॅम्प क्र. ३ मधील व्यापारी सुनील तलरेजा यांचे इंदरदीप कन्स्ट्रक्शन कंपनी व इंदरदीप इंफा इंडिया या दोन कंपन्यांची कार्यालये हिराघाट येथील केस्ट्रल प्राईड इमारतीत आहेत. दिल्लीतील विकास जैन, अंकुर जैन आणि आस्था जैन हे एच.सी. पाईप्स प्रा. लि. तसेच एच.सी. पाईप्प अँड वॉल्स ट्रेडिंग कंपनीचे संचालक असून, त्यांनी तलरेजा यांच्या कार्यालयात येऊन बांधकाम व्यवसायासाठी लागणारे डीआय व एमएस पाईपसह विविध साहित्य वेळेवर पुरविण्याचे आश्वासन दिले.
व्यवहारात विश्वास निर्माण करण्यासाठी सुरुवातीच्या काही ऑर्डर्स वेळेवर पाठवून त्यांनी तलरेजा यांचा विश्वास संपादन केला. मात्र, नंतर मोठ्या प्रमाणात ‘आगाउ’ रक्कम घेतल्यानंतर संबंधित साहित्य पाठवणे त्यांनी बंद केले. ऑर्डरनुसार माल मिळत नसल्याने तलरेजा यांनी चौकशी केली असता, जैन बंधूंकडून गुगल ड्राइव्हवर बनावट डिस्पॅच तपशील तसेच व्हॉट्सअॅपवर बनावट ई-बिले पाठविल्याचे उघड झाले. जून २०२३ ते २९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत या तिघांनी २५ कोटी ३ लाख ५७ हजार ३५६ रुपयांची फसवणूक केल्याचे तलरेजा यांनी तक्रारीत नमूद केले आहे. तक्रार प्राप्त होताच मध्यवर्ती पोलिसांनी तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

