बदलापूरमध्ये ईव्हीएम ठप्प

बदलापूरमध्ये ईव्हीएम ठप्प

Published on

बदलापूरमध्ये ईव्हीएम ठप्प
खामकर विद्यालय मतदान केंद्रात गोंधळ; वीज खंडित, मशीन बिघाडाने अडथळे

बदलापूर, ता. २ (बातमीदार) : बदलापूर पश्चिम येथील खामकर विद्यालय मतदान केंद्रात मंगळवारी (ता. २) सकाळी ईव्हीएम मशीनमध्ये झालेल्या गंभीर बिघाडामुळे मतदान प्रक्रिया तब्बल दोन तास ठप्प राहिली. सुमारे ९०० मतदार असलेल्या या केंद्रावर अकराच्या सुमारास दोन नंबरची मशीन अचानक बंद पडली. त्यात अनेकदा वीजपुरवठा खंडित झाल्याने मतदारांचा त्रास अधिक वाढला. मतदानाची पॅनेल पद्धत पूर्णपणे समजली नसल्याने काही मतदारांनी चुकीची बटणे दाबल्यामुळे मशीन बंद पडल्याची माहिती पुढे आली. अभियंत्यांचे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तातडीने पर्यायी मशीन उपलब्ध करून दिली; मात्र या संपूर्ण प्रक्रियेला दोन ते अडीच तास लागल्याने रांगेत उभ्या असलेल्या मतदारांमध्ये संताप उसळला.

दीडच्या सुमारास मशीन पुन्हा सुरू झाली, पण तोपर्यंत केंद्राबाहेर भल्या मोठ्या रांगा निर्माण झाल्या होत्या. वयोवृद्ध, महिलांपासून दिव्यांग मतदारांना मोठी गैरसोय सहन करावी लागली. बसण्यासाठी व्यवस्था नाही, पाण्याची सोय नाही आणि वारंवार होणाऱ्या वीज खंडितमुळे अनेकांना त्रास झाला. काही मतदारांना उभे राहून चक्कर येण्याची वेळ आली. लोकशाहीचा मूलभूत अधिकार बजावण्यासाठी आलेल्या नागरिकांचा वेळ वाया गेला असून, मतदानाच्या दिवशी व्यवस्थापन का ढासळले, हा प्रश्न मतदारांकडून उपस्थित केला जात आहे. केंद्राबाहेर उभ्या असलेल्या मतदारांनी परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

दोन तास रांगेत थांबूनही मतदान होऊ शकले नाही. अनेकांना पॅनेल पद्धत समजली नसल्याने चुकीची बटणे दाबली गेली आणि मशीन बंद पडली. या गोंधळात आमचा मोठा खोळंबा झाला.
कैलास कांबळे, मतदार

मी डोंबिवलीहून मतदानासाठी आले, पण मशीन बंद, वीजपुरवठादेखील खंडित, त्यात बसण्याची आणि पाण्याची सुविधा नाही. त्यामुळे मतदारांची अक्षरशः परीक्षा घेण्यात येत आहे. ही निवडणूक प्रक्रिया की आमची चेष्टा, असा सवाल निर्माण होत आहे.
सुविधा जाधव, मतदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com