बदलापुरात मतदानासाठी रांगा
तणावातही उत्साही मतदान
तीन बटणांमुळे गती मंदावली; मतदारांना तासभर प्रतीक्षा
बदलापूर, ता. २ (बातमीदार) : राजकीय राडेबाजी आणि हाणामारीच्या घटनांमुळे शहरात तणावाचे वातावरण असतानाही बदलापूरकरांनी लोकशाहीचा उत्सव उत्साहात साजरा केला. सकाळी साडेसातच्या ठोक्याला मतदानास सुरुवात होताच शहरातील सर्व केंद्रांवर मतदारांनी लांबलचक रांगा लावत आपला मतदानाचा हक्क बजावला. महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदारांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली. परंतु पॅनल पद्धतीत पहिल्यांदाच नगराध्यक्ष सह दोन उमेदवारांना एकाच वेळी मत द्यावे लागत असल्याने काही मतदारांमध्ये गोंधळ उडाला. प्रशासनाने प्रत्येक मतदारामागे एक मिनिट वेळ गृहीत धरला होता; मात्र प्रत्यक्षात त्याहून अधिक वेळ लागत असल्याने मतदानाची गती मंदावली आणि रांगा मार्गावर व वसाहतीपर्यंत सरकत गेल्या. सायंकाळी साडेपाचला मतदान प्रक्रिया संपली असली तरी अनेक केंद्रांबाहेर रांगा असल्याचे चित्र दिसून आले.
मतदान केंद्रांवर काही मिनिटांतच नागरिकांच्या लांबलचक रांगा तयार झाल्या आणि अनेक ठिकाणी मतदारांना तासभरापेक्षा जास्त प्रतीक्षा करावी लागली. मतदारांना नगराध्यक्ष आणि ‘अ’ व ‘ब’ पॅनेलमधील दोन नगरसेवकांसाठी असे तीन वेळा बटण दाबून मतदान करावे लागत होते. सरासरी एका मतदारामागे प्रशासनाने एक मिनिटाचा वेळ गृहीत धरला असला, तरी तीन वेळा बटण दाबण्याच्या प्रक्रियेमुळे त्याहून अधिक वेळ खर्च करावा लागत होता. ज्येष्ठ नागरिकांसह अनेकांचा यामुळे गोंधळ झाला.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (भाजपा-राष्ट्रवादी युती) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (शिवसेना शिंदे गट) यांच्या अंतिम टप्प्यातील सभांमुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली. या प्रतिष्ठेचे प्रतिबिंब मतदान केंद्रांवरही दिसले.
वाहतुकीस अडथळे
सकाळपासूनच अनेक केंद्रांवर जागेअभावी मतदारांच्या रांगा रस्त्यांवर आणि वसाहतींपर्यंत वाढल्या. यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण झाले. वाढत्या गर्दीमुळे काही मतदान केंद्रांवर पोलिस बंदोबस्त वाढवून परिसरातील हालचाल नियमित करण्यात येत होती.
वाहनांची मोफत सुविधा
राजकीय पक्षांकडून मतदारांना केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी रिक्षा, दुचाकी अशा वाहनांची मोफत सोय करण्यात आली होती. ती वृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी मोठा दिलासा ठरली. काही केंद्रांबाहेर चहा, पाणी आणि नाश्त्याची सोयही करण्यात आली होती. दरम्यान, १०० मीटर प्रतिबंधित क्षेत्रातही काही ठिकाणी उमेदवार आणि कार्यकर्ते मतदारांशी संवाद साधत असल्याची दृश्ये दिसली.
लोकशाहीचा उत्सव
सर्व अडचणींवर मात करीत बदलापूरकरांनी लोकशाहीचा उत्सव मनापासून साजरा केल्याचे स्पष्ट झाले. प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांनीसुद्धा उत्साहपूर्ण वातावरणात मतदानाचा हक्क बजावला. १० वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदान करायला मिळाल्याचा आनंदही मतदारांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

