खोपोलीकरांची प्रतीक्षा वाढली
खोपोलीकरांची प्रतीक्षा वाढली
थेट नगराध्यक्षपद कोणाच्या खात्यात? निकाल २१ डिसेंबरला
खालापूर, ता. ३ (बातमीदार) ः चार वर्षे रखडलेल्या निवडणुका, सलग प्रशासकीय कारभाराचा कंटाळा आणि स्थानिक नागरी समस्या या सर्वांच्या पार्श्वभूमीवर खोपोलीकरांनी अखेर उत्साहाने मतदान करून सत्तेच्या पुनर्स्थापनेची जोरदार चाहूल दिली आहे. थेट नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शहरात तब्बल ६८.७२ टक्के मतदान नोंदले गेले असून, विशेष म्हणजे महिलांनी मोठ्या संख्येने मतदान केंद्रांकडे धाव घेत ऐतिहासिक सहभाग नोंदवला आहे.
यंदाच्या निवडणुकीत २०,८६४ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला, तर २१,६७४ पुरुषांनी मतदान केले आहे. एका तृतीयपंथी मतदारानेही मतदान करून लोकशाही प्रक्रियेला योगदान दिले. ‘लाडक्या बहिणींनी’ नगराध्यक्षपदाची ओवाळणी कोणाला करायची, या प्रश्नाचे उत्तर २१ डिसेंबरला मिळणार असून, खोपोली शहरात त्याची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. खोपोलीतील लढत मुख्यतः परिवर्तन आघाडी विरुद्ध महायुती अशी रंगली आहे. दोन्ही गटांनी विजयाचा दावा केला असला तरी आघाडीत अखेरच्या क्षणी झालेल्या बिघाडीने समीकरणे बदलली आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा रुसवा आणि त्यांची साधारण ८,५०० मतांची ताकद कोणाच्या बाजूला वळली, या प्रश्नावरच नगराध्यक्षपदाची वाटचाल अवलंबून राहणार आहे. या मतांच्या हालचालीवर संपूर्ण राजकीय चित्र पालटू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
................
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला जाणार की राहणार?
खोपोली नगर परिषदेत १५ वर्षांहून अधिक काळ राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. शहर कायम राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. मागील थेट नगराध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुमन औसरमल यांनी ७०० मतांनी विजय मिळवला होता. या वेळी मात्र महायुतीचे कुलदीपक शेंडे आणि परिवर्तन आघाडीचे सुनील पाटील यांच्यात चुरशीची लढत झाली आहे. सुज्ञ खोपोलीकरांनी कोणावर विश्वास ठेवला हे निकालच सांगतील.
..........
शांततेत मतदान; प्रशासनाची प्रशंसा
रायगडमधील रोहा व महाड येथे दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला असला, तरी खोपोलीत मात्र अत्यंत शांततेत मतदान पार पडले. निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत संकपाळ यांचे अचूक नियोजन, तर कायदा-सुव्यवस्थेसाठी उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहुल आणि पोलिस निरीक्षक सचिन हिरे यांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत झाली. शहरातील नागरिकांनीही शिस्तबद्धता पाळून लोकशाही सण साजरा केल्याची प्रशंसा होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

