दिंडी सोहळ्यात दत्तगुरूंचा गजर
दिंडी सोहळ्यात दत्तगुरूंचा गजर
चिरनेरमध्ये दत्तजयंती उत्सवाची लगबग
उरण, ता. ३ (वार्ताहर) ः शहरासह परिसरातील विविध भागांत दत्तजयंती उत्सव साजरा करण्याची जोरदार तयारी सुरू आहे. प्रत्येक गावात उत्सव समित्यांकडून सजावट, धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असून चिरनेर-कातलपाडा येथे दत्तगुरूंच्या पादुकांचा दिंडी सोहळा आकर्षण ठरला.
उरणमधील दत्तजयंती हा शहरातील मोठ्या उत्सवांपैकी एक मानला जातो. उत्सवानिमित्त बाजारपेठेत दोन दिवस विविध प्रकारची दुकाने थाटली जातात. यामध्ये कपडे, सौंदर्यप्रसाधने, हिवाळी वस्तू, शोपीस, काचेची भांडी आदींच्या दुकानांचा समावेश आहे. शहराबाहेरील एन. आय. हायस्कूलच्या मैदानात उभारलेले आकाशपाळणेही नागरिकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहेत. शहरातील देऊळवाडी, नवे पोपूड, पाणदिवे, चिरनेर, उरण पोलिस ठाणे, न्हावा-शेवा पोलिस ठाणे व वाहतूक शाखा येथील मंदिर परिसराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
--------------------
चोख बंदोबस्त
चिरनेरमध्ये दत्तजयंतीनिमित्त तीन दिवसांचा उत्सव होणार आहे. पहिल्या दिवशी दिंडीचे आयोजन, दुसऱ्या दिवशी मुख्य दत्तजयंती उत्सव तर तिसऱ्या दिवशी पारायण होणार आहे. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे.

