एरोली कळवा कॉरिडॉर बाधितांचे पुनःर्वसनाचे करारपत्र ; मगच सर्वेक्षण
आधी बाधितांचे पुनर्वसन!
ऐरोली-कळवा कॉरिडॉरवरुन जितेंद्र आव्हाड आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : नागरी परिवहन प्रकल्पांतर्गत ऐरोली-कळवा कॉरिडॉर प्रस्तावित करण्यात आला आहे. हा कॉरिडॉर कळवा शहरातील भोला नगर, छत्रपती शिवाजी महाराज नगर येथून जाणार असून यामध्ये ७८६ झोपड्या बाधित होणार आहे. या भागातील हजारो झोपडीधारकांना प्रवासापासून सर्वच समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे झोपडीधारकांचे एकत्रित पुनर्वसन करण्याआधी करारपत्र करावे, तरच या भागातील सर्वेक्षण आणि इतर कामे करू देऊ. अन्यथा, कोणत्याही प्रकारचे साहाय्य करणार नसल्याचा इशारा शरद पवार पक्षाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा तीनमधील ऐरोली-कळवा कॉरिडॉर या कामामध्ये बाधित भोलानगर व शिवाजीनगर येथील प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याबाबत पालिका आयुक्तांनी जितेंद्र आव्हाड यांना पत्र पाठविले आहे. या पत्रात सर्वेक्षण करण्याबाबत माहिती दिली असली तरी पुनर्वसन कुठे आणि कसे करणार, याबाबत स्पष्टता नसल्याने हजारो कुटुंबांच्या निवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे डॉ. जितेंद्र आव्हाड हे आक्रमक झाले आहेत. या एलिव्हेटेड रेल्वे कॉरिडॉरचे काम आम्ही सन २०१७ पासून अडवून ठेवले होते. हे काम अडविण्यामागे येथील साडेतीन हजार झोपडीधारकांचे पुनर्वसन हे मुख्य कारण आहे. या ठिकाणी वास्तव्यास असणारे बहुतांशी लोक हे हातावर कमावणारे आहेत. या झोपड्यांमधील महिला धुणीभांडी करून उदरनिर्वाह करत आहेत. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन इतरत्र कुठेही झाले तर ही मंडळी जगूच शकणार नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांशी आपली चर्चा झाली होती. मुख्यमंत्र्यांनी झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते. पण, हे पुनर्वसन इतरत्र करण्यास आमचा विरोध आहे. ठाणे पालिकेकडून पत्र आले असले तरी लेखी आश्वासन दिले जात नाही. तोपर्यंत आपण या भागात सर्वेक्षणही होऊ देणार नाही, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला.
७८६ झोपड्या बाधित
या परिसरात साडेतीन हजारांच्या आसपास झोपड्या आहेत. त्यामध्ये ७८६ झोपड्या प्रत्यक्ष बाधित होत आहेत. मात्र, हजारो झोपडीधारकांना जाण्यायेण्याची समस्या निर्माण होणार आहे. आतापर्यंत या भागात अनेक रेल्वे अपघात झाले असून त्यामध्ये अनेकांना जीव गमवावे लागले असून किती तरी जणांना अपंगत्व आले आहे. या परिसरात नागरी सुविधांची तर बोळवणच केली जात आहे. या भागातून तीन रेल्वे मार्ग जाणार असल्याने स्थानिकांचा या प्रकल्पाला प्रचंड विरोध आहे.
शासनाच्या भूखंडावर करावे पुनर्वसन
ज्या परिसरात रेल्वेचा हा प्रकल्प होत आहे, तिथे सरकारी मालकीचे अनेक भूखंड आहेत. या भूखंडांवर इमारत बांधून पुनर्वसन करावे. त्यासाठी झोपडीधारकांना लेखी पत्र देऊन करारपत्र करावे, असेही आव्हाड यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

