माणगाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात

माणगाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात

Published on

माणगाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात
लोणेरे येथे दोन दिवस विविध नवकल्पनांची जल्लोषात मांडणी
माणगाव, ता. ४ (वार्ताहर) ः शिक्षण विभाग, पंचायत समिती माणगाव, पन्हळघर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ लोणेरे आणि माणगाव तालुका विज्ञान व गणित अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लोणेरे येथील जे. बी. सावंत हायस्कूलमध्ये १ व २ डिसेंबर रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडले. विकसित आणि आत्मनिर्भर भारत या थीमवर आधारित या प्रदर्शनात बालवैज्ञानिकांनी त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि सर्जनशील प्रतिकृतींमधून विज्ञानाचा प्रभावी संगम सादर केला.
प्रास्ताविकात सुरेखा तांबट यांनी विज्ञान प्रदर्शन हे विद्यार्थ्यांच्या शोधक वृत्ती, कलात्मकता, वैज्ञानिक दृष्टी, सादरीकरण कौशल्य आणि आत्मविश्वास वाढविणारे सक्षम व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन केले, तर गटविकास अधिकारी शुभदा पाटील यांनी तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीसोबत संवेदनशीलता टिकून राहणेही अत्यंत महत्त्वाचे, असे सांगत विद्यार्थ्यांना चौकस राहण्याचा सल्ला दिला. नानासाहेब सावंत यांनी तंत्रज्ञानाचा अतिरेक टाळण्याचे आणि त्याचा सकारात्मक वापर करण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. दुसऱ्या दिवशी अध्यक्ष भाऊसाहेब सावंत यांनी भाभा बालवैज्ञानिकांसोबत संवाद साधत त्यांच्या प्रतिकृतींची माहिती जाणून घेतली. शिक्षक व पालक विज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांच्या शोधक वृत्तीला कसे प्रोत्साहन देऊ शकतात याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. उद्‌घाटन सोहळ्यास माणगाव तालुका गटविकास अधिकारी शुभदा पाटील, कार्याध्यक्ष नानासाहेब सावंत, जे. बी. सावंत विद्यालयाचे अध्यक्ष भाऊसाहेब सावंत, गटशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट, तसेच लोणेरे ग्रामपंचायत सरपंच प्रकाश टेंबे, विस्ताराधिकारी कुमार खामकर, प्राचार्य बी. आर. कांबळे, गणित-विज्ञान मंडळाचे पदाधिकारी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
................
विद्यार्थ्यांकडून प्रतिकृती सादर
प्रदर्शनात इयत्ता ६ वी ते ८ वी गटात ३६ प्रतिकृती, तर ९ वी ते १२ वी गटात २७ प्रतिकृती सादर झाल्या. याशिवाय दिव्यांग विद्यार्थ्यांच्या तीन, प्राथमिक शिक्षकांच्या तीन, आणि माध्यमिक शिक्षकांच्या चार प्रतिकृतींचाही समावेश होता. प्रतिकृतींचे विषय शाश्वत शेती, कचरा व्यवस्थापन व प्लॅस्टिकला पर्याय, हरित ऊर्जा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, मनोरंजक गणितीय मॉडेलिंग, आरोग्य व स्वच्छता, जलसंवर्धन आणि व्यवस्थापन अशा महत्त्वपूर्ण क्षेत्रांवर आधारित होते.

बालवैज्ञानिकांनी सादर केलेल्या या सर्जनशील आणि नावीन्यपूर्ण संकल्पनांनी प्रदर्शनाला रंगतदार रूप दिले. दोन दिवस चाललेल्या या विज्ञान सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयीची ओढ आणखी वृद्धिंगत झाल्याचे शिक्षकांनी नमूद केले.

फोटो ओळ : माणगाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन, लोणेरे येथे उत्साहात संपन्न झाले. त्या वेळी उपस्थित शिक्षकांचा समूह.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com