वर्षभरात अंबरनाथ-बदलापूर कचरामुक्त

वर्षभरात अंबरनाथ-बदलापूर कचरामुक्त

Published on

वर्षभरात अंबरनाथ-बदलापूर कचरामुक्त
१४८ कोटींचा एकात्मिक घनकचरा प्रकल्प सुरुवातीच्या टप्प्यात
अंबरनाथ, ता. ७ (वार्ताहर) : अंबरनाथ आणि बदलापूर शहरासाठी अनेक वर्षांपासून डोकेदुखी ठरलेला कचराप्रश्न कायमचा मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू झाली असून, येत्या वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल, अशी माहिती शिवसेनेचे (शिंदे गट) नगरसेवकपदाचे उमेदवार शैलेश भोईर आणि प्रमोद चौबे यांनी दिली.

नगरविकास विभागाने या प्रकल्पासाठी १४८.६८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. अंबरनाथ आणि बदलापूरच्या सीमारेषेवरील वालिवली येथील कचराभूमी परिसरात उपलब्ध २३ एकरांपैकी साडे तेरा एकर जागेवर हा प्रकल्प उभा राहत आहे. हा प्रकल्प राज्यातील पहिला पूर्णतः ‘बंदिस्त कचरा प्रक्रिया प्रकल्प’ असणार आहे, ज्यामुळे कचरा कुठेही उघड्यावर टाकला जाणार नाही. नागरिकांपर्यंत दुर्गंधी पोहोचणार नाही. माश्या, धूर किंवा प्रदूषणाचा त्रास शून्य असेल.

प्रकल्प युरोपातील (विशेषतः स्पेन) आधुनिक प्रणालीवर आधारित असून, त्याची क्षमता दररोज ७०० ते ८०० मेट्रिक टन कचरा प्रक्रिया करण्याची आहे. या प्रकल्पात दोन बायो-फिल्टर तंत्रज्ञान भारतात प्रथमच बसवले जात आहे, ज्यामुळे दुर्गंधी नियंत्रणात राहील. स्वयंचलित यंत्रणेद्वारे कचऱ्याचे ओला, सुका, राडारोडा, काच, प्लॅस्टिक, कापड असे वैज्ञानिक वर्गीकरण केले जाईल. ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत, बांधकाम कचऱ्याचा भूभराव. प्लॅस्टिक, काच, कापड यांची रिसायकल प्रक्रिया होईल. आरडीएफ प्रकारच्या कचऱ्यापासून उच्च उष्मांकाचा ‘कांदा कोळसा’ तयार केला जाईल. या प्रकल्पामुळे डम्पिंग (कचरा टाकण्याची) संकल्पनाच पूर्णपणे नष्ट होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

कामाची सद्यस्थिती आणि लक्ष्य
प्रकल्पातील मुख्य शेडचे सुमारे ७० ते ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रशासकीय इमारतीसाठी आवश्यक ५० टक्क्यांपेक्षा अधिक डोंगर खोदकाम पूर्ण झाले आहे. प्रकल्पाचे समन्वयक नायर सर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आवश्यक यंत्रसामग्रीपैकी (मशिनरी) ५० टक्के मुंबई पोर्टवर पोहोचली असून, जानेवारीत तिचे इंस्टॉलेशन सुरू होईल, तर उर्वरित सामग्री मार्चमध्ये येणार आहे.

उल्हासनगरचाही १००-२०० टन कचरा जमा करणार
सुरुवातीला अंबरनाथ आणि बदलापूरचा कचरा या प्रकल्पात स्वीकारला जाईल आणि आवश्यकता भासल्यास उल्हासनगरचा १००-२०० टन कचरादेखील प्रक्रिया केला जाईल. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर दोन्ही शहरांच्या नागरिकांची दुर्गंधी आणि कचरा ढिगाऱ्यांपासून कायमची मुक्तता होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com