डम्पिंग ग्राऊंडमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गदा
डम्पिंग ग्राउंडमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गदा
कचरा जाळण्यामुळे धुराचे प्रदूषण; पोयनाडवासीयांचा वाढला संताप
पोयनाड, ता. ७ (बातमीदार) ः अलिबाग तालुक्यातील पोयनाड ग्रामपंचायत हद्दीत नवेनगर फाट्याजवळ असलेले डम्पिंग ग्राउंड परिसरातील नागरिकांसाठी अतिधोकादायक बनले आहे. कचऱ्याच्या वाढत्या ढिगाऱ्यांमुळे निर्माण झालेली अस्वच्छता, दुर्गंधी तसेच या ठिकाणी वारंवार पेटवला जाणारा कचरा यामुळे उद्भवणारा धूर, याचा त्रास नागरिकांना मोठ्या प्रमाणात सोसावा लागत आहे. दिवसरात्र पेटवण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे परिसराला प्रदूषणाचा विळखा बसला असून, रहिवासी प्रशासनाविरोधात संतप्त झाले आहेत.
पेझारी-नागोठणे रस्त्यालगत असलेल्या या डम्पिंग ग्राउंडच्या अगदी शेजारी आंबेपूर ग्रामपंचायत हद्दीतील स्वयंभू गृहसंकुल आहे. केवळ काही मीटर अंतरावर वसलेल्या या गृहसंकुलातील रहिवाशांना धूर, दुर्गंधी आणि असह्य उष्णतेचा प्रचंड सामना करावा लागत आहे. कचरा पेटल्यावर उठणारा दाट धूर अनेकांच्या थेट घरात जात आहे. त्यामुळे घरातील दरवाजे-खिडक्या बंद करून राहण्याशिवाय पर्याय राहात नाही. विशेषतः रात्रीच्या वेळेस धूर अधिक प्रमाणात पसरत असल्याने नागरिकांना नीट झोप घेणेही कठीण झाले आहे. या परिसरातील सर्वात गंभीर परिस्थिती जवळच असलेल्या रुग्णालयातील रुग्णांची आहे. धुरामुळे श्वसनाचा त्रास वाढणे, डोळ्यांची जळजळ, ॲलर्जी यांसारख्या समस्या वारंवार उद्भवत असल्याचे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. कचरा जाळण्यामुळे निर्माण होणाऱ्या विषारी धुराचा परिणाम वयोवृद्ध, लहान मुले आणि दमा किंवा फुप्फुसविकार असलेल्या रुग्णांवर सर्वाधिक होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. डम्पिंग ग्राउंडमधील कचऱ्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत असून, त्याची नियमित विल्हेवाट लावण्याची व्यवस्था ढासळलेली दिसते. कचरा व्यवस्थापनात प्रशासनाकडून सातत्याचा अभाव आणि निष्काळजी स्पष्टपणे जाणवत असल्याची टीका स्थानिक नागरिक करत आहेत.
...........................
डोळ्यांमध्ये चुरचुर
या डम्पिंग ग्राउंडजवळ पोयनाड बाजारपेठेला जाणारा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांनाही धुराचा तीव्र त्रास सहन करावा लागतो. अगदी काही अंतरावर असलेल्या क्रिकेट मैदानावर सराव करणाऱ्या खेळाडूंनाही धुरामुळे श्वसनाचा त्रास व डोळ्यांमध्ये चुरचुर जाणवत आहे. खेळाडू, प्रशिक्षक आणि पालकांच्याही तक्रारी वाढत आहेत. नागरिकांनी संबंधित प्रशासन, पोयनाड ग्रामपंचायत आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे यापूर्वीही अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत, परंतु कचरा जाळण्यावर बंदी, कचरा वर्गीकरण व्यवस्था, नियमित स्वच्छता याबाबत अद्याप ठोस पावले उचललेली दिसत नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या रोषात भर पडत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

