काळाकुट्ट धुराने वाडेकर कासावीस
दिलीप पाटील : सकाळ वृत्तसेवा
वाडा, ता. ९ : लखमापूर येथील सनराईज ग्रीन इंडस्ट्रीज या टायर कंपनीत रविवारी (ता. ७) रिॲक्टर स्फोट होऊन दोन कामगारांचा मृत्यू झाला. यामुळे टायर कंपनीच्या उत्पादनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तालुक्यातील ५४ टायर कंपन्या दिवस-रात्र काळाकुट्ट प्रदूषणकारी धूर ओकत आहेत. त्यांच्या त्रासाने नागरिकांना श्वसनाचे आजार जडू लागल्याने ग्रामस्थ कासावीस झाले आहेत. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने अखेर तीन महिन्यांपूर्वी ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात प्रश्न उपस्थित केल्याने त्याची तत्काळ दखल घेत पालकमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिल्याने अखेर वाड्यातील ५४ टायर कंपन्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंद केल्या आहेत; मात्र या कंपन्या कागदोपत्री बंद असल्या तरी रात्री, तसेच शनिवार ते रविवार या सुट्टीच्या दिवशी त्या सुरूच असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
वाडा तालुक्यात साधारणपणे ७२ टायर कंपन्या सुरू असून या कंपन्यांमध्ये जुने टायर जाळून त्यापासून तेल, तारा काढून त्याची विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते. यापासून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. या कारखान्यातील सांडपाणी हे येथील नाल्यात सोडले जात असल्याने मासे व जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडत आहेत. शिवाय, कामगारांची कोणत्याही प्रकारची सुरक्षा बघितली जात नसल्याने या कंपन्यांमध्ये बॉयलरच्या स्फोटात वारंवार कामगार मृत्युमुखी पडत आहेत. तालुक्यातील उसर, दिनकर पाडा, वडवली, बिलोशी, पालसई, सापना, किरवली, नेहरोली, तोरणे, कोने, कोनसई लखमापूर या गावांमध्ये टायर कंपन्या बसलेल्या आहेत.
वाड्यातील नागरिकांनी पालकमंत्र्याच्या जनता दरबारात प्रदूषणासंदर्भात तक्रार केली असता त्यावर कारवाई करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाला देण्यात आले. या अनुषंगाने प्रदूषण नियंत्रण मंडळाने ५४ कारखान्यांना बंदची नोटीस पाठवली आहे, तरीसुद्धा कारखानदार रात्रीच्या वेळेस व सुट्टीच्या दिवशी कारखाने चालवत असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळ कल्याणच्या प्रदूषण अधिकारी सीमा दळवी यांच्याशी दूरध्वनीवरून वारंवार संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
कंपन्यांची सुरक्षा वाऱ्यावर
बहुसंख्य कंपन्या सरकारी नियमांचे उल्लंघन करून सुरू असल्याचे उघड झाले आहे. या कंपन्यांमध्ये सुरक्षेची व्यवस्था नाही. कारखान्याची परवानगी कंपन्यांकडे नाहीत, वनविभागाची परवानगी ही नाही, नगररचना विभागाकडून बांधकामाची सनद ही घेतलेली नाही, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नाहरकत दाखल्यावरच हे कारखाने उभे आहेत. नगररचना विभागाकडून माहिती अधिकाराखाली घेतलेल्या माहितीच्या आधारे हे उघड झाले असल्याचे पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात ही माहिती उघड झाली आहे.
अन्य कंपन्यांनी घेतला धसका
वाडा तालुक्यातील अनेक गावांत टायर कंपन्या वसलेल्या आहेत. या कंपन्या धूर ओकत असल्याने आजूबाजूच्या परिसराला त्याचा धोका उत्पन्न झाला आहे. या प्रदूषणामुळे इतर कंपन्या वैतागल्या असून त्या स्थलांतर करण्याच्या मनःस्थितीत आहेत. जर त्यांनी स्थलांतर केले, तर हजारो कामगार बेकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अनेक कंपन्यांना बंदची नोटीस असतानाही त्या सुट्टीच्या दिवशी व रात्रीच्या सुमारास चालू असतात. या सर्वांना प्रदूषण नियंत्रण मंडळ जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
- श्रीकांत भोईर, सामाजिक कार्यकर्ते

