मोकळ्या हवेत विद्यार्थ्यांना वाचनाचा आनंद
मोकळ्या हवेत विद्यार्थ्यांना वाचनाचा आनंद
निसर्गसंगतीत अभ्यासाची नवी संकल्पना
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ ः अभ्यासिका किंवा वाचनालय म्हटले की चार भिंतींच्या आत बाकावर शांततेत सुरू असलेले वाचन असेच चित्र येते; मात्र ठाण्यातील कशिश पार्क येथील धर्मवीर आनंद दिघे वाचनालयाने एक पाऊल पुढे टाकत विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सान्निध्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्याच वर्षी सुरू झालेल्या या वाचनालयाने ‘ओपन टू स्काय’ या संकल्पनेवर आधारित गच्चीवर विद्यार्थ्यांसाठी हिरवीगार अभ्यासिका उभारली आहे. सभोवताली हिरवाई, मोकळे आकाश आणि हातात पुस्तक असा वाचनाचा आनंद त्यामुळे विद्यार्थ्यांना मिळत आहे.
सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेले ठाणे आपल्या कला साहित्यासाठी प्रसिद्ध आहे. विकासाकडे झेप घेत असताना शहरांमध्ये वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी, तसेच विविध क्षेत्रांत झेप घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माहितीपर पुस्तकांचे दालन उपलब्ध व्हावे, यासाठी शहरांमध्ये अनेक वाचनालये सुरू आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रातील कशिश पार्क येथे मराठी ग्रंथालयासारखे सुसज्ज वाचनालय व्हावे, यासाठी शिंदे गटाचे माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि नम्रता भोसले यांनी प्रयत्न केले.
आनंद दिघे वाचनालय
ठाणे महापालिकेने कशिश पार्क येथील क्लस्टर डेव्हलपमेंट कार्यालयाच्या इमारतीमध्ये गेल्याच वर्षी आठव्या मजल्यावर धर्मवीर आनंद दिघे वाचनालय सुरू केले. या वाचनालयामध्ये सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत. अगदी स्पर्धा परीक्षांसाठी सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आवश्यक असणारी पुस्तके येथे आहेत. सुमारे १०० जण बसू शकतील इतकी आसन व्यवस्था येथे आहे. इतकेच नव्हे तर संगणक एमपी थिएटर अशा सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वर्षभरातच हे वाचनालय ठाणेकर विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरले आहे.
‘ओपन टू स्काय’ संकल्पना
या वाचनालयाला अधिक मोकळे करण्यासाठी नम्रता भोसले यांच्या संकल्पनेतून आता ओपन टू स्काय या धर्तीवर हिरवीगार अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. वाचनालयाच्या बाहेर असलेल्या टेरेसवरील मोकळ्या जागेत अभ्यासिका उपलब्ध करून दिली आहे. डोळ्यांना थंडावा देणारी हिरवाई, मोकळी हवा आणि हातामध्ये पुस्तक असा अनुभव त्यामुळे विद्यार्थ्यांना येत आहे किंवा ओपन गार्डन हॉटेलमध्ये जसे अल्हाददायक वातावरण असते तसाच काहीसा अनुभव येथे येतो, असे येथील विद्यार्थ्यांनी सांगितले.

